Download App

चिराग-स्टॅलिन सुसाट, गाठला 100 टक्के स्टाईक रेट; भाजप-शिंदेंचा डाव निम्म्यावर

भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे.

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार झटका बसला. यंदा भाजपला बहुमत सुद्धा मिळवता आलं नाही. दुसरीकडे काँग्रेसने आपल्या जागा दुपटीने वाढवल्या आणि मतांच्या टक्केवारीतही वाढ केली. या निवडणुकीत एनडीए कमकुवत झाला तर इंडिया आघाडी मजबूत झाली आहे. पण असे असले तरी इंडिया आघाडीला बहुमत मिळालेले नाही. एनडीए आघडीकडे बहुमत आहे त्यामुळे आघाडी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकते. तशा हालचालीही भाजपने सुरू केल्या आहेत.

या निवडणुकीत काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे. आता पाच किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या पक्षांचा स्ट्राइक रेट काय राहिला? या पक्षांनी किती उमेदवारांना तिकीट दिले होते आणि त्यांना किती जागांवर यश मिळाले याची माहिती घेऊ या..

या पक्षांनी जिंकल्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त जागा

2024 मधील लोकसभा निवडणुकीत 11 पक्ष असे आहेत ज्यांनी पाच किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजप, तेलुगू देसम पार्टी, जेडीयू, शिवसेना, लोजपा, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उबाठा) यांचा समावेश आहे. या राजकीय पक्षांमध्ये द्रमुक, लोजपा, तेलुगू देसम पार्टी आणि जेडीयू या पक्षांनी 75 टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.

Lok Sabha 2024 : इलेक्शनमध्ये ट्विस्ट, भाजपला धक्का; यंदा 208 मतदारसंघात पक्षच बदलला

भाजपने एकूण 440 उमेदवारांना तिकीट दिले होते त्यापैकी 240 उमेदवार विजयी झाले आहेत. पार्टीचा स्ट्राइक रेट 54.54 टक्के राहिला. काँग्रेसने 327 उमेदवारांना तिकीट दिले होते यातील 99 उमेदवार विजयी झाले. पक्षाचा स्ट्राइक रेट 30.27 टक्के राहिला. समाजवादी पार्टीने एकूण 77 उमेदवारांना तिकीट दिले होते. यातील 37 उमेदवार विजयी झाले. पक्षाचा स्ट्राइक रेट 52.11 टक्के राहिला. तृणमूल काँग्रेसने एकूण 48 उमेदवारांना तिकीट दिले होते यापैकी 29 उमेदवारांनी विजय मिळवला. पक्षाचा स्ट्राइक रेट 60.42 टक्के राहिला.
तामिळनाडूतील द्रमुक पक्षाने एकूण 22 उमेदवारांना उमेदवारी दिली होती. यातील सगळेच म्हणजे 22 उमेदवार विजयी झाले. पक्षाचा स्ट्राइक रेट 100 टक्के राहिला आहे.

द्रमुकने सर्व जागा जिंकल्या

तेलुगू देसम पक्षाने 17 उमेदवारांना तिकीट दिले होते त्यापैकी 16 उमेदवारांनी विजय मिळवला. पक्षाचा स्ट्राइक रेट 94.12 टक्के इतका राहिला. तसेच बिहारमधील जेडीयूने 16 उमेदवारांना तिकीट दिले होते त्यापैकी 12 उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत जेडीयूचा स्ट्राइक रेट 75 टक्के राहिला आहे. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाने 22 जागांवर उमेदवार दिले होते. या सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या आहेत.

स्ट्राइक रेट 30 ते 75 टक्क्यांच्या आत असलेले पक्ष

अकरा प्रमुख राजकीय पक्षांतील सात पक्ष असे आहेत ज्यांनी 30 ते 75 टक्क्याच्या आत जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षांचा समावेश आहे.

सत्तास्थापनेचं ठरलं! नितीश कुमारांच्या पक्षाला किती मंत्रीपदं? वाचा काय आहे गणित

चिरागच्या पक्षाचा स्ट्राइक रेट शंभर टक्के

शिवसेना उबाठा पक्षाने या निवडणुकीत 21 मतदारसंघात उमेदवार दिले होते. त्यापैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत. पक्षाचा स्ट्राइक रेट 42.86 टक्के राहिला. शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या होत्या. त्यांचे सात उमेदवार विजयी झाले. त्यांचा ही स्ट्राइक रेट 66.67 टक्के राहिला. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने एकूण 15 जागांवर उमेदवार दिले होते त्यापैकी सात जणांनी बाजी मारली. या पक्षाचा स्ट्राइक रेट 44.67 टक्के राहिला. तसेच बिहारमधील लोजपा पक्षाने पाच जागांवर उमेदवार दिले होते. या पाचही जागा जिंकून पक्षाने शंभर टक्के स्ट्राइक रेट मिळवला.

दरम्यान, देशात एनडीए सरकार पुन्हा येईल अशी शक्यता दिसून येत आहे. आघाडीला बहुमत मिळाले आहे. यामध्ये एकट्या भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. भाजपला एकट्याच्या बळावर बहुमत मिळवता आलं नाही. त्यामुळे आता आघाडीतील मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. याआधी 2014 मध्ये 282 आणि 2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या.

follow us

वेब स्टोरीज