Download App

भारताचं पहिलं बजेट कुणी मांडलं? कुणाच्या नावावर बजेटचं रेकॉर्ड.. वाचा खास माहिती सविस्तर

एनडीए सरकारचं  (NDA Government) पहिलं बजेट 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत.

Union Budget 2024 : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर एनडीए सरकारचं  (NDA Government) पहिलं बजेट 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. सर्वसाधारण बजेट आणि अंतरिम बजेट मिळून सीतारमण सातव्यांदा बजेट (Union Budget 2024) सादर करतील. तसं पहायला गेलं तर हे एक रेकॉर्डच म्हणावं लागेल. परंतु सर्वाधिक वेळा बजेट सादर करण्याचा विक्रम दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर आहे. देशात सर्वाधिक वेळा बजेट सादर (Budget 2024) करण्याचं रेकॉर्ड माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. इतकेच नाही तर आपल्या वाढदिवशी दोन वेळा बजेट सादर करण्याचाही विक्रम त्यांच्या नावावर आहे. चला तर मग जाणून घेऊ या सगळाच किस्सा..

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 112 अंतर्गत आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर सरकारला संसदेत सर्वसाधारण किंवा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणे बंधनकारक आहे. निवडणुकीच्या वर्षात अंतरिम तर अन्य वेळेस सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जातो. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम बजेट सादर केले होते. आता सरकार अस्तित्वात आल्यानंतर अस्थासंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय बजेट सादर केले जाईल.

हरियाणाची लढाई ‘आप’ला टफ, केजरीवालांना 5 चॅलेंज; ‘त्या’ घोषणेने केली वाट बिकट?

पहिलं बजेट कुणी मांडलं होतं?

भारताच पहिलं बजेट इंग्रजांच्या काळात म्हणजेच 7 एप्रिल 1860 रोजी ब्रिटिश अर्थशास्त्री जेम्स विल्सन यांनी सादर केले होते. ईस्ट इंडिया कंपनीचा लेखाजोखा आणि भारतात नवीन कर लादण्यासाठी हे बजेट मांडण्यात आले होते. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिलं अंतरिम बजेट लियाकत अली खान यांनी सादर केलं होतं. नंतर हेच लियाकत खान पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan) बनले होते. स्वतंत्र भारतात पहिलं सर्वसाधारण बजेट शनमुखम चेट्टी यांनी सादर केले होते. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते. हे बजेट 16 नोव्हेंबर 1947 या दिवशी सादर करण्यात आले होते.

मोरारजी देसाई यांनी दहा वेळेस मांडलं बजेट

देशाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा बजेट सादर करण्याचे रेकॉर्ड मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. गुजरात राज्यातील वलसाडमध्ये 29 फेब्रुवारी 1896 रोजी देसाई यांचा जन्म झाला होता. 13 मार्च 1958 मध्ये त्यांनी भारताच्या अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली होती. 29 ऑगस्ट 1963 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. त्यानंतर मार्च 1967 मध्ये त्यांनी पुन्हा या पदाचा कारभार हाती घेतला होता. यावेळी जुलै 1969 पर्यंत मोरारजी देसाई या पदावर होते. या कार्यकाळात त्यांनी तब्बल दहा वेळेस बजेट सादर केले होते.

या काळात दोनदा तर अर्थमंत्र्यांचा वाढदिवस होता. देसाई यांचा जन्मदिवस 29 फेब्रुवारी रोजी होता. हा दिवस चार वर्षांतून एकदाच येतो. त्यावेळी बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केले जात होते. याच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी 1964 आणि 1968 मध्ये दोनदा देसाई यांनी बजेट सादर केले होते.

ED ची मोठी कारवाई! हरयाणातील काँग्रेस आमदाराला बेड्या; राज्यात उडाली खळबळ

सितारमण यांच्याकडून सहा वेळा बजेट सादर

मोरारजी देसाई यांच्यानंतर पी. चिदंबरम यांचं नाव आहे. चिदंबरम यांनी एकूण नऊ वेळा बजेट सादर केले आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री म्हणून आठ वेळेस तसेच माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीही आठ वेळेस बजेट सादर केले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सहा वेळेस तर विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही आतापर्यंत सहा वेळेस बजेट सादर केले आहे.

मोरारजी देसाई नंतर पंतप्रधान देखील झाले होते. देशात सन 1977 मध्ये पहिलं बिगर काँग्रेसी सरकार बनलं त्या सरकारमध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान होते. त्यावेळी देसाई यांचं वय 81 होतं. 24 मार्च 1977 रोजी त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली आणि 28 जुलै 1979 पर्यंत ते या पदावर होते. मोरारजी देसाई यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न तसेच पाकिस्तान सरकारचा निशान ए पाकिस्तान हा पुरस्कार देखील मिळाला होता.

follow us