PM Narendra Modi on Mahatma Gandhi : ज्यावेळी महात्मा गांधी यांच्यावर पहिला चित्रपट बनला त्यावेळी जगात महात्मा गांधी यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. याआधी मात्र त्यांना कुणीही ओळखत नव्हतं. महात्मा गांधी यांचे विचार जगभरात पोहोचविण्यासाठी मागील 75 वर्षांच्या काळात काहीच झांल नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एबीपी न्यूजला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. काँग्रेससह इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली.
पराभव झाला तरी खचून जाऊ नये; लोकसभा निकालापूर्वीच अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश
महात्मा गांधी एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांना आपण जगभरात ओळख मिळवून द्यायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कुणीच ओळखत नव्हतं. ज्यावेळी पहिल्यांदा महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट तयार झाला त्यावेळी जगभरात कुतूहल निर्माण झालं की महात्मा गांधी नेमके कोण आहेत. महात्मा गांधी यांची जगात ओळख निर्माण करून देण्यासाठी आपण मागील 75 वर्षात काहीच केलं नाही, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्यूथर किंग यांना जगभरात ओळखलं जातं. खरंतर महात्मा गांधी त्यांच्या तुलनेत कुठेच कमी नव्हते. मी जगभरात फिरलो आहे. गांधींना आणि त्यांच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती ती मिळाली नाही. महात्मा गांधींचे विचार आज जगातील अनेक समस्यांचे समाधान आहे, असेही मोदी म्हणाले.
यानंतर मोदींनी राम मंदिरावर भाष्य केलं. ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने राम मंदिर प्रकरणात निकाल दिला. त्यावेळी देशात कुठेच हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत. ही शांती एकतर्फी नव्हती. याचं श्रेय सर्वांनाच जातं. राम मंदिराचा सोहळा अयोध्येत पार पडला त्यावेळी बाबरी मशीदीचे पक्षकार इकबाल अंसारी देखील तेथे उपस्थित होते. हाच आपला खरा भारत आहे. या गोष्टींचं आम्ही कधीच मार्केटिंग करत नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
भाजप ‘या’ राज्यात करणार मोठा उलटफेर; PM मोदींनीच केलं भाकित
काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले, आधी काँग्रेस आणि अन्य नेते निवडणुकीच्या वेळी मंदिरात जात होते. आता मात्र ते मंदिरात जात नाहीत. इतकंच नाही तर या निवडणुकीच्या काळात एकही नेता इफ्तार पार्टीला गेला नाही. कारण त्यांनाही या गोष्टीची जाणीव झाली आहे की आता देशात या पद्धतीचं राजकारण चालणार नाही.