Pahalgam Terror Attack PM Modi Residence CCS Meeting : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक घेत आहेत. या बैठकीत भारताच्या सुरक्षा परिस्थितीवर विशेषतः पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये सखोल चर्चा केली जात आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल, गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव, परराष्ट्र सचिव आणि इतर उच्च अधिकारी उपस्थित आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काही दिवसांपूर्वीच श्रीनगरहून दिल्लीला परतले (PM Modi Residence) आहेत. परतल्यानंतर लगेचच त्यांनी सीसीएस बैठकीला हजेरी लावली. काल घडलेल्या घटनेनंतर शाह श्रीनगरला रवाना झाले. ते आज सकाळी पहलगाममधील घटनास्थळी गेले होते. त्यांनी जखमींची भेट घेतली आणि श्रीनगरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली.
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला हा एक क्रूर आणि अमानवी कृत्य आहे. या हल्ल्याबद्दल संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. सर्वजण भ्याड दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. पंतप्रधान मोदी त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावरच सोडून भारतात परतले आहेत. त्याच वेळी सीसीएस बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भविष्यातील रणनीतीवर चर्चा होत आहे. पाकिस्तानबाबत काही मोठा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.
सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती म्हणजे काय?
कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ही देशातील सर्वोच्च सुरक्षा समिती आहे. परंतु, संविधानामध्ये याचा उल्लेख नाही. राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि सीमा सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सीसीएस समिती धोरणात्मक निर्णय घेते. पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष आहेत, तर संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.