Download App

केजरीवाल, सिसोदिया ‘जायबंदी’ : पक्ष अडचणीत असताना राघव चढ्ढा कुठे गायब?

रणांगणात लढाई सुरु होणार असते, पण त्यापूर्वीच सेनापती जायबंदी व्हावा. दुसरा सेनापती आधीच जायबंदी झालेला असावा… अशावेळी सैन्याला हवा असतो आश्वासक योद्धा. असा एक योद्धा जो बलाढ्य शत्रु पुढेही हार मानणार नाही, मान तुकवणार नाही, सैन्याचे मनोधैर्य खचू देणार नाही. आपल्या ताफ्यात असा योद्धा असूनही संकटाच्या काळात पुढे नसेल, लढत नसेल, नेतृत्व करत नसेल तर मग शंका यायला लागतात. अशीच शंका सध्या यायला लागली आहे ती आम आदमी पक्षाचा सर्वात आश्वासक चेहरा, तरुण-तडफदार योद्धा म्हणून ओळखले जाणारे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chhadha) यांच्याबद्दल. (Raghav Chadha has not been in India for a month. He has also been missing from the media since February)

सध्याच्या घडीला आम आदमी पक्ष (Aam Aadami Party) मोठ्या राजकीय संकटातून जात आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक झालेली आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि दुसरे प्रमुख नेते मनिष सिसोदिया (Manish Sisodia) हे दीड वर्षांपासून जेलमध्ये आहेत. लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुकीचा प्रचार, राज्यांमधील निवडणूक यंत्रणा या सगळ्या गोष्टींना दिशा दाखविण्यासाठी आवश्यक असणारे दोन्ही प्रमुख चेहरे गायब आहेत. अशावेळी आम आदमी पक्षाचे मनोधैर्य खचू न देण्यासाठी पक्षाला एका योद्ध्याची आवश्यकता आहे. राघव चढ्ढा यांच्याकडे हा आश्वासक चेहरा म्हणून पाहिले जात असताना मागील महिन्याभरापासून ते भारतातच नाहीत. त्याआधी फेब्रुवारी महिन्यापासून ते माध्यामांमधूनही गायब आहेत. त्यामुळेच चढ्ढा यांच्याविषयी शंका यायला लागली आहे…. ते भाजपमध्ये जाणार आहेत का? ते भाजपला लढाई सोप्पी करुन देत आहेत?

पाहुयात नेमके कुठे आहेत राघव चढ्ढा आणि ते का गायब आहेत?

राघव चढ्ढा सध्या लंडनमध्ये आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. चड्ढा यांनी आठ मार्च रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून लंडनला पोहोचल्याची माहिती दिली होती. नऊ मार्चला त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने आयोजित ‘लंडन इंडिया फोरम 2024’ मध्ये सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमात त्यांची पत्नी, अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील वक्ता म्हणून सहभागी झाली होती. 20 मार्च रोजी चढ्ढा परिणीतीसह वेस्टमिन्स्टर पॅलेसमध्येही गेले होते. तिथे ते हाऊस ऑफ कॉमन्समधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. चढ्ढा यांनी त्यांना आणि परिणीतीला मिळालेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटोही शेअर केला होता. या भेटीदरम्यान राघव यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटिश खासदार प्रीत कौर गिल यांचीही भेट घेतली होती.

अशातच 21 मार्चला संध्याकाळी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील दारू घोटाळ्यात ईडीने अटक केली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर चढ्ढा यांनी दोन ट्विट केले. पहिले हिंदीत आणि दुसरे इंग्रजीमध्ये. यामध्ये त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला होता. त्यानंतर त्यांनी केजरीवाल यांचा बचाव करत भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधत एक व्हिडिओही शेअर केला. तेव्हापासून ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून केवळ अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची पत्रकार परिषद शेअर करत आहेत. केजरीवाल यांना पाठिंबा देणाऱ्या भारत आघाडीच्या नेत्यांची विधाने आणि रामलीला मैदानावरील विरोधकांच्या रॅलीचे व्हिडिओ शेअर करत आहेत.

PM मोदी आज विदर्भात, चंद्रपूरमधून मुनगंटीवारांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार

पण ज्या व्यक्तीला पक्षाचा प्रमुख चेहरा मानला जातो, ज्या व्यक्तीला माध्यमांमध्ये चर्चेत राहण्याची सवय आहे, तो व्यक्ती पक्षाच्या प्रमुखांच्या अटकेनंतर अनेक दिवस फक्त एक व्हिडिओ बाइट शेअर करतो, हे थोडसे न पटणारे आहे. त्यामुळेच अनेक अफवांना खतपाणी मिळते.

इथे आणखी एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे ती म्हणजे, या चर्चा फक्त राघव चढ्ढा भारताबाहेर आहेत, ट्विटरवर प्रतिक्रिया देत नाहीत म्हणून सुरु झालेल्या नाहीत. फेब्रुवारीपासून त्यांनी प्रसारमाध्यमांमधील संवादही कमालीचा कमी केला होता. याचकाळात ईडी केजरीवालांविरोधातील फास घट्ट करत होती. केजरीवाल यांना ईडी सतत समन्स पाठवत होती आणि केजरीवाल ईडीसमोर हजर होत नव्हते. ते ईडीच्या समन्सबाबत वेगळी कायदेशीर लढाईही लढत होते, त्यामुळे पक्षाच्या प्रवक्त्यांची संपूर्ण फौज रणनीती बनवण्यात आणि केजरीवालांचा बचाव करण्यात व्यस्त होती. या काळात भाजप सतत केजरीवालांवर हल्ला करत होता. त्यामुळे पक्षाला भाजपच्या या नॅरेटिव्हला उत्तर देऊ शकतील अशा अधिकाधिक लोकांची आवश्यकता होती.

यावेळी चड्ढा या संपूर्ण घटनांमध्ये कुठेही दिसत नव्हते. केजरीवाल यांचा बचाव करण्यासाठी सार्वजनिक व्यासपीठावरही दिसले नाहीत. राघव चढ्ढा यांची शेवटची पत्रकार परिषद जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाली होती. चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या हेराफेरीवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यांनी फेब्रुवारीमध्येही केवळ पाच ट्विट केले होते. यातील एक केजरीवाल यांचे ट्विट रिट्विट केले होते. तर स्वतःहुन एकच राजकीय ट्विट केले होते. यात चंदीगड महापौर निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक केले होते. आम आदमी पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांनी चंदीगड महापौर निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद पक्षाच्या नेत्यांनी उत्साहाने शेअर केली पण राघव चढ्ढा यांनी केजरीवाल यांची ही पत्रकार परिषद शेअर केली नाही.

अवकाळी पावसाचं संकट कायम! विदर्भ, मराठवाड्यात पावसाची इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

राघव चढ्ढा यांचा शस्त्रक्रियेसाठीचा लंडन दौरा, प्रीत कौर गिल यांची भेट आणि मौन यामुळे भाजप नेत्यांना आम आदमी पक्षावर निशाणा साधण्याची संधी मिळाली. प्रीत कौर गिल या खलिस्तानी समर्थक मानल्या जातात. या भेटीवरुन भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, भारतात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पण अरविंद केजरीवाल यांचे आश्वासक नेते राघव चढ्ढा लंडनमध्ये आहेत. का? चड्ढा प्रीत गिलच्या संपर्कात का आहेत? ते डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रिटनमध्ये असल्याचे आम्हाला कळले. मग तसे असेल तर दिल्लीच्या आरोग्य सेवेतील सुधारणांचे काय झाले? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

राघव चढ्ढा यांची वकृ्त्व शैली चांगली आहे. तरुण त्यांच्याकडे आकर्षित होतात. ते 2022 मध्ये पंजाबचे प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. पंजाबचे राजकारण चढ्ढा यांना अत्यंत जवळून माहिती आहे. आता लोकसभा निवडणुकीतही पंजाबमध्ये चढ्ढा यांची भूमिका महत्वपूर्ण मानली जात होती. अशा परिस्थितीत, चढ्ढा यांची अनुपस्थिती पंजाबसाठी एक मोठी राजकीय समस्या बनली आहे.

राघवसह आम आदमी पक्षाच्या 4 नेत्यांना अटक होऊ शकते?

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी मनीष सिसोदिया, संजय सिंह यांना दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचीही ईडीने चौकशी केली. अलीकडेच ईडीने आम आदमी पार्टीचे सहप्रभारी दीपक सिंघला यांच्या निवासस्थानी छापा टाकला आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत यांची चौकशी करण्यात आली. ईडीने दारू घोटाळ्यात राघव चड्ढा यांचा उल्लेख केला असला तरी अद्याप त्यांची चौकशी झालेली नाही.

या दरम्यान, दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी दावा केला होता की भाजपने त्यांना त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यामार्फत पक्षात येण्याची ऑफर दिली होती. दिल्ली सरकार अस्थिर करण्याची भाजपची योजना असून लवकरच आम आदमी पक्षाच्या आणखी चार नेत्यांना अटक केली जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले होते. आतिशी यांनी या चार नेत्यांमध्ये राघव चड्ढा यांचेही नाव घेतले होते. त्यांनी स्वतःशिवाय सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक यांचीही नावे घेतली होती.

अशात संजय सिंह यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यावर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. राघव चढ्ढा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आम आदमी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आजचा दिवस भावनिक आहे. संजय सिंह आमचा सिंह सोडला आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. पण या ट्विटमुळे राघव चड्ढाबद्दल व्यक्त केल्या जात असलेल्या शंकांना पूर्णविराम मिळेल का, हा प्रश्न अजूनही कायम आहे.

follow us

वेब स्टोरीज