Download App

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल! आधार पडताळणीशिवाय… कधीपासून नियम लागू होणार?

Railway Ministry Rule Change For Booking Tickets : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता वापरकर्ते आधार प्रमाणीकरणाशिवाय तात्काळ रेल्वे तिकिटे (Railway Tickets Rule) बुक करू शकणार नाहीत. मंत्रालयाने स्पष्ट केलं की, तिकीट बुकिंगबाबतचा हा मोठा बदल 1 जुलै 2025 पासून लागू केला जाणार (Railway Ministry Rule Change) आहे. या बदलांचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर (आता X) एका पोस्टद्वारे काही (Railway Ministry) दिवसांपूर्वी दिले होते.

रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात, सर्व रेल्वे झोनशी माहिती शेअर करताना, सामान्य वापरकर्त्यांना तत्काळ योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. 1 जुलै 2025 पासून, फक्त आधार पडताळणी केलेले (वापरकर्तेच आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकतील. त्यानंतर 15 जुलै 2025 पासून तत्काळ बुकिंगसाठी आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण देखील अनिवार्य केले जाईल. याशिवाय, रेल्वे तिकीट एजंट देखील तत्काळ तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे तिकिटे बुक करू शकणार नाहीत. ही वेळ एसी क्लाससाठी सकाळी 10:00 ते 10:30 आणि नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11:00 ते 11:30 पर्यंत असेल.

10 जूनला निवृत्ती अन् 11 जूनला ‘या’ संघाचा कर्णधार; निकोलस पूरन पुन्हा चर्चेत

रेल्वेमंत्र्यांनी बदलाचे संकेत दिले होते

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 4 जून रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे बदलाचे संकेत दिले होते. त्यांनी सांगितलं होतं की, भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी ई-आधार प्रमाणीकरणाचा वापर सुरू करेल. या प्रणालीद्वारे, रेल्वेच्या खऱ्या वापरकर्त्यांना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळविण्यात मदत होईल. या महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली सुरू होण्याची अपेक्षा आहे. आता रेल्वे मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा केली आहे. ही प्रक्रिया 1 जुलैपासून लागू केली जाईल.

ऑनलाइन तात्काळ तिकीट बुकिंगची परवानगी

आयआरसीटीसीच्या मते, देशात त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या 13 कोटींहून अधिक आहे, परंतु या वापरकर्त्यांपैकी फक्त 10 टक्के वापरकर्ते आधार पडताळणीकृत आहेत. अशा परिस्थितीत, तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारतीय रेल्वेने नियम कडक केले आहेत. फक्त आधार पडताळणी केलेल्या आयआरसीटीसी खात्यांना ऑनलाइन तात्काळ तिकीट बुकिंग करण्याची परवानगी दिली आहे.

ट्रम्पना भिडणाऱ्या एलन मस्कची तलवार म्यान, मागितली माफी; म्हणाले, “मला दुःख वाटतं की..”

बनावट आयडींवर कडक कारवाई

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका अहवालात सांगण्यात आले होते की, तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये सतत अनियमितता आढळल्यानंतर, सरकारने बनावट आयडी असलेल्या वापरकर्त्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आयआरसीटीसीने गेल्या एका वर्षात 3.5 कोटी बनावट यूजर आयडी ब्लॉक केले आहेत. ज्यामुळे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील सिस्टमची गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आता रेल्वे मंत्रालय या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आधार प्रमाणीकरणाचा नियम लागू करत आहे.

 

follow us