Rajasthan Elections : राजस्थानमध्ये कुणाचं सरकार येणार?, काँग्रेस सत्ता राखणार की कमळ उमलणार? याचा फैसला उद्याच होणार आहे. मात्र त्याआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला (Rajasthan Elections) आहे. काँग्रेस आणि भाजपकडून विजयाचे दावे केले जात आहेत. त्यातच आता राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) अॅक्शन मोडध्ये आल्या आहेत. मतदानानंतर जे एक्झिट पोल आले त्यात काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढाई होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये (Exit Polls 2023) राज्यात भाजपाची सत्ता येईल असे म्हटले आहे. त्यामुळे भाजप अॅक्टिव्ह झाला आहे. सर्वच पक्षांनी अपक्ष आणि बंडखोर आमदारांशी संपर्क सुरू केला आहे.
वसुंधरा राजे स्वतः आघाडीवर असून त्यांच्याकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे. काँग्रेसही यात मागे नाही. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास सत्तेची चावी अपक्षांकडेच राहणार आहे. त्यामुळे या उमेदवारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. वसुंधरा राजे सिंधिया यांनी शुक्रवारी सांचोरचे माजी आमदार आणि यंदा अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे जीवराम चौधरी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चौधरी यांनीही त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत विजयाचे प्रमाणपत्र घेऊन जयपूरला येत असल्याचे सांगितले.
Rajasthan Election : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, काँग्रेस जादुई आकडा पार करेल, गेहलोतांचा दावा
जीवराम चौधरी यांनी सांचोर मतदारसंघात भाजपविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढली आहे. त्यांची लढत काँग्रेसचे सुखराम विश्नोई यांच्याशी आहे. विशेष म्हणजे, वसुंधरा राजे यांच्याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही चौधरींना फोन केला होता असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. परंतु, चौधरी यांनी निवडणूक निकालानंतरच आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितल्याचे समजते. बाडमेर जिल्ह्यातही भाजपात बंडखोरी झाली. त्यामुळे आता येथील बंडखोरांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न भाजपाने सुरू केले आहेत. येथील बंडखोर रवींद्र सिंह भाटी आणि प्रियंका चौधरी यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. काँग्रेसने या दोघांना संपर्क केला आहे.
किती टक्के झाले मतदान?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 68.24 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील सर्वात जास्त मतदान जैसलमेर जिल्ह्यात सुमारे 76.6 टक्के आणि सर्वात कमी पाली जिल्ह्यात 60.7 टक्के मतदान झाले.मतदानासाठी राज्यात एकूण 51,890 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत 5 कोटी 26 लाख 90 हजार 146 मतदारांनी 1862 उमेदवारांचे भवितव्य ठरवले आहे.
Rajasthan Elections : 0.74 टक्के मतदान ठरविणार राजस्थानचे राजकीय भविष्य? वाचा इनसाईड स्टोरी