Jaya Bachchan in Parliament : दहा दिवसांत तिसरी वेळ होती की ज्यावेळी पूर्ण नाव घेतलं म्हणून खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) कमालीच्या नाराज झाल्या. त्यांनी थेट सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्याशीच पंगा घेतला. त्यांनाच चार शब्द सुनावून टाकले. धनखडही मागे राहिले नाहीत. त्यांनीही तितक्याच तडफेने जया बच्चन यांना प्रत्युत्तर दिले. पण प्रकरण इथंच थांबलं नाही. विरोधी पक्षांनी वॉक आऊट करत आगीत तेल ओतण्याचं काम केलं. आपण नावात काय ठेवलंय असं म्हणतो पण जया बच्चन यांनी त्यांच्या नावावरुनच तीनदा सभागृहात रौद्र रुप धारण केलं.
जया बच्चन नावाच्या मुद्द्यावर पहिल्यांदा 29 जुलै रोजी नाराज झाल्या होत्या. त्यावेळी सभापतींनी त्यांना (Parliament Session) जया अमिताभ बच्चन या पूर्ण नावाने संबोधित केले होते. यावर जया बच्चन नाराज झाल्या होत्या. तुम्हा लोकांच्या नजरेत महिला काहीच नाहीत. महिलांची काही ओळख नाही असं तुम्हाला वाटतं. जसं तसं हे प्रकरण शांत झालं होतं. त्यानंतर पुन्हा 2 ऑगस्ट रोजी असाच प्रकार घडला. यावेळेस जया बच्चन यांनीच त्यांच्या पूर्ण नावाचा उच्चार केला. त्यावर सभापतींना हसू आवरलं नाही. यावेळी जास्त काही वाद झाला नाही.
आज मात्र जो वाद झाला तो जरा जास्तच वाढला होता. आज राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांचं नाव घेतलं. त्यावेळी जया बच्चन यांना राग अनावर झाला. मी एक कलाकार आहे आणि मला बोलण्याचा टोन, बॉडी लँग्वेज यांसारख्या गोष्टी चांगल्या समजतात. माझं नाव घेताना तुमच्या बोलण्याचा टोन योग्य नव्हता असे जया बच्चन म्हणाल्या.
Video: ‘आपकी टोन ठीक नही’; खासदार जया बच्चन यांचा आरोप; राज्यसभा सभापती जोरदार भडकले
यानंतर धनखडही मागे राहिले नाहीत. त्यांनी आज तर जया बच्चन यांना चांगलंच खडसावलं. तुम्ही सेलिब्रिटी असलात तरी तुम्ही मोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत. तुम्ही सेलिब्रिटी आहात. असं असताना माझ्या टोनवर प्रश्नचिन्ह उभं करत आहात? मी हे सहन करणार नाही. दरम्यान, जगदीप धनखर यांनी जया बच्चन यांना सेलिब्रिटी म्हणताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला. जया बच्चन या संसदेच्या ज्येष्ठ सदस्य आहेत, मग त्यांना तुम्ही सेलिब्रिटी कसं म्हणू शकता? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. यावर जगदीप धनखर म्हणाले, ज्येष्ठ सदस्य खुर्चीचा अवमान करत आहेत. चर्चेदरम्यान सर्व विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहातून सभात्याग केला.
संसदेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या, जगदीप धनखड सभापतींच्या खुर्चीत बसले आहेत. पण त्यांची बोलण्याची पद्धत योग्य नाही. ते सगळ्यांशी अशाच पद्धतीने बोलतात. संसद म्हणजे शाळा नाही आणि येथे मुलांप्रमाणे बोललेही जाऊ नये. सभागृहात बुद्धिहीन, बालकबुद्धी यांसारखे शब्द वापरले जातात. विरोधी पक्षांच्या खासदारांबाबत सभापतीचं वागणं बरोबर नाही. यामध्ये सभापतींनी सुधारणा करावी आणि माफी मागावी अशी मागणी जया बच्चन यांनी केली.
जया बच्चन खरंच नावाच्याच मुद्द्यावर नाराज झाल्या आहेत की यामागे वेगळंच काही कारण आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण 2 ऑगस्टला जया बच्चन यांनीच स्वतःचं नाव घेताना जया अमिताभ बच्चन असं पूर्ण नाव घेतलं होतं. यावर सभापतींसह सभागृहात उपस्थित खासदारही हसले होते. यावेळी जया बच्चन मला माझ्या नावावर गर्व आहे असं म्हणाल्या होत्या.
Parliament Session : ‘जया अमिताभ बच्चन’ उच्चारावरुन खडाजंगी; विरोधकांकडून सभात्याग
सन 2004 मध्ये जया बच्चन पहिल्यांदा राज्यसभेत नियुक्ती मिळाली होती. समाजवादी पार्टीने त्यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं होतं. तेव्हापासून जया बच्चन खासदार आहेत. याच काळात राज्यसभेत चार सभापती आणि चार उपसभापती बदलले. पण या मुद्द्यावर कधीच वाद झाला नाही. जगदीप धनखड सुद्धा मागील दोन वर्षांपासून सभापती आहेत. तरी देखील वाद झाले नाहीत. पण 2024 मध्ये ज्यावेळी संसदेचं अधिवेशन सुरू झालं त्याच वेळी हा वाद सुरू झाला. यामागे विरोधी पक्षांचं काही वेगळं राजकारण आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
सन 2024 मध्ये जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेत आहेत. समाजवादी पार्टीने त्यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी दिली होती. यावेळी जया बच्चन यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्यात त्यांच्याकडे दीड हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची चल आणि अचल संपत्ती आहे. त्यांच्या संपत्तीचा स्त्रोत संसदेचं वेतन, जाहिराती आणि चित्रपटांचं मानधन असल्याचे जया बच्चन यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
Video: ‘आपकी टोन ठीक नही’; खासदार जया बच्चन यांचा आरोप; राज्यसभा सभापती जोरदार भडकले