भाजप आणि काँग्रेसच्या बँक बॅलन्समध्ये किती फरक? अजय माकनने दिली धक्कादायक आकडेवारी
Ajay Maken On Election Commission : निवडणूक सुधारणावर राज्यसभेत बोलताना काँग्रेस खासदार अजय माकन यांनी निवडणूक आयोगाव
Ajay Maken On Election Commission : निवडणूक सुधारणावर राज्यसभेत बोलताना काँग्रेस खासदार अजय माकन यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत 2004 पासून 2024 पर्यंत काँग्रेस आणि भाजपच्या बँक बॅलन्सची तुलना करत धक्कादायक आकडेवारी दिली आहे. राज्यसभेत बोलताना अजय माकन म्हणाले की, 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेस आणि भाजपच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तपशीलांचे प्रमाण 60:40 होते, परंतु 2019 मध्ये हे प्रमाण पूर्णपणे बदलले आहे. 2014 नंतर हे प्रमाण 8:92 झाले आणि भाजपचे उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढले आणि हा ट्रेंड सुरूच आहे.
आर्थिक असमानता
निवडणूक सुधारणावर राज्यसभेत बोलताना काँग्रेस खासदार अजय माकन (Ajay Maken) यांनी भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) असणाऱ्या आर्थिक असमानतेवरुन निवडणूक आयोगाला टार्गेट करत जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2004 ते 2024 दरम्यान भाजप आणि काँग्रेसच्या आर्थिक क्षमतेत मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2004 मध्ये भाजपचा बँक बॅलन्स 87. 96 कोटी होता जो आता 10,107.2 कोटी झाला आहे. तर 2004 मध्ये काँग्रेसचा बॅलन्स 38.48 कोटी होता तर 2024 मध्ये 133.97 कोटी आहे.
काँग्रेसला 210 कोटींची नोटीस
या चर्चेदरम्यान पुढे बोलताना अजय माकन म्हणाले की, 2024 च्या निवडणुका 16 मार्च रोजी जाहीर झाल्या होत्या मात्र काँग्रेसची बँक खाती एक महिना आधी 13 फेब्रुवारी रोजी सील करण्यात आली होती मात्र यावर निवडणूक आयोगाने कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि आयकर विभागाने काँग्रेसला 210 कोटींची नोटीस बजावली. या दरम्यान काँग्रेसच्या बँक खात्यांमधून 133 कोटी रुपयांचा आयकर कापण्यात आला आणि 23 मार्च रोजी त्यांची खाती उघडण्यात आली असं असेल तर मुख्य विरोधी पक्ष निवडणुकीची तयारी कशी करेल? असं अजय माकन म्हणाले.
निवडणूक आयोगाचे काम लोकशाहीचे रक्षण करणे आहे मात्र यात आयोग पूर्णपणे अपयशी ठरले आहे असेही राज्यसभेत बोलताना माकन म्हणाले. माकन यांनी असा दावा केला की मोठे उद्योगपती आता 95:5 च्या प्रमाणातही काँग्रेसला देणगी देण्यास घाबरत आहेत, कारण ते असे करताच अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभाग त्यांच्या मागे येईल. सत्ताधारी पक्षाकडे विरोधी पक्षांपेक्षा 75 पट जास्त संपत्ती असताना अशा परिस्थितीत लोकशाही कशी टिकू शकते असा प्रश्न त्यांनी विचारला.
तर निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत माकन म्हणाले की, हरियाणामध्ये निवडणुका झाल्या आणि 5 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने रात्री उशिरा आकडेवारी जाहीर केली, ज्यामध्ये 61.19 टक्के मतदान झाल्याचे नमूद केले होते, जे 6 ऑक्टोबर रोजी 65.65 टक्के झाले आणि नंतर मतमोजणीदरम्यान 68 टक्के झाले.
अजय माकन यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भाजप आणि काँग्रेसचे बँक बॅलन्स:
काँग्रेस भाजप
2004 : ₹38 कोटी ₹88कोटी
2009 : ₹221 कोटी ₹150 कोटी
2014 : ₹390 कोटी ₹295 कोटी
2019 : ₹315 कोटी ₹3,562 कोटी
2024 : ₹133 कोटी ₹10, 107 कोटी
