भाजप- शिवसेना एकत्र लढणार महापालिका निवडणूक; शिंदेंसोबतच्या मॅरेथॉन बैठकीनंतर मोठा निर्णय
Ravindra Chavan On Mahayuti : राज्यात पुढील काही दिवसात महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
Ravindra Chavan On Mahayuti : राज्यात पुढील काही दिवसात महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदेनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत सर्व महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) फोडाफाडीचा राजकारणावरुन आरोप-प्रत्योरोप पाहायला मिळाले होते. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वयंबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता दोन्ही पक्ष महायुती म्हणून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. 11 डिसेंबरच्या रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई (BMC Election) , ठाण्यासह महत्वाच्या महानगरपालिकेत युती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अन्य महानगर पालिकेसाठी स्थानिक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले की, महानगर पालिका निवडणुकांमध्ये युतीसाठी वरिष्ठ नेते आग्रही होते. मुंबई, ठाणे सारख्या महापालिकेत युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. तर अन्य महापालिकेसाठी स्थानिक पातळीवर युतीबाबत एक समिती तयार होईल आणि त्यात चर्चा होईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही मुद्यांवर चर्चा झाली असून या बैठकीत युती करण्यावर एकमत झाले आहे. पालिका निवडणुकीत कसं सामोरे जायचं याबद्दल देखील चर्चा करण्यात आली अशी देखील माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. राज्यात 264 नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेनेत आरोप -प्रत्योरोप करण्यात येत होते.
Pune Airport : मोठी बातमी! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या 7 महिन्यांनी जेरबंद
मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला होता. यानंतर रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असल्याची प्रतिक्रिया दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. तर दुसरीकडे या निवडणुकीदरम्यान भाजपकडून अनेक शिवसेनेच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या.
