लखनऊ : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election 2024) विरोधकांच्या इंडिया आघाडी आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, नंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी साथ सोडल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल हा पक्षही भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. (Rashtriy Lok Dal chief Jayant Chaudhary ready to join hands with BJP-NDA)
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना केंद्र सरकारने आज (9 फेब्रुवारी) भारतरत्न पुरस्काराची घोषणा केली. यानंतर राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आगामी युतीचे संकेत दिले. भाजपसोबत जाण्यावर ते म्हणाले की, मी नकार कसा देणार? आता काही शिल्लक आहे का? माझे वडील अजित सिंह यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे. पंतप्रधानांना जनतेच्या भावना कळतात. हा माझ्यासाठी संस्मरणीय आणि भावनिक क्षण आहे.
चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याच्या घोषणेनंतर जयंत चौधरी भावूक झाले. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा मोठा दिवस आहे. माझ्यासाठी एक भावनिक आणि संस्मरणीय क्षण आहे. मी राष्ट्रपती, भारत सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. यामुळे संपूर्ण देशाला मोठा संदेश गेला आहे. सरकारच्या या निर्णयाशी देशाच्या भावना निगडित आहेत. मोदीजींनी हे सिद्ध केले आहे की त्यांना देशातील जनतेच्या भावना कळतात.
#WATCH | When asked if he is ready to join hands with BJP-NDA, RLD chief Jayant Chaudhary says, "Koi kasar rehti hai? Aaj main kis muh se inkaar karoon aapke sawalon ko." pic.twitter.com/6dTo21wzk6
— ANI (@ANI) February 9, 2024
नरेंद्र मोदी यांनी असे निर्णय घेतले आहेत जे पूर्वीचे सरकार आजपर्यंत घेऊ शकले नाही. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. वडील चौधरी अजित सिंह यांची आठवण काढत त्यांनी सांगितले की, यासाठी त्यांनी दीर्घकाळ लढा दिला. चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी चार दशकांपासून होत आहे. याकडे अनेक सरकारे आली, पण लक्ष दिले गेले नाही. नरेंद्र मोदी सरकारने जनतेच्या भावना समजून घेतल्या आहेत, असेही ते म्हणाले.
मागील चार दिवसांपासून राष्ट्रीय लोक दल आणि भाजप युतीच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु होत्या. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मात्र आज जयंत चौधरी यांनीच या युतीचे संकेत दिले. समाजवादी पक्षाने काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील जागा वाटप घोषित केले होते. त्यात काँग्रेसला 11 तर राष्ट्रीय लोक दलला सात जागा देऊ केल्या होत्या.
पण यातील चार जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार राष्ट्रीय लोक दलाच्या तिकीटावर उभे राहतील, अशी अट टाकल्याचा आरोप राष्ट्रीय लोक दलाने केला होता. त्यानंतरच या आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान आता भाजपने राष्ट्रीय लोक दलाला चार लोकसभा आणि एक राज्यसभा देण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती आहे. तर जयंत चौधरी यांनी मात्र आपली 12 जागांवर तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.