पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी शरद पवार गटाचे सर्व 8 खासदार दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे लोकसभेतील सर्व आठ खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Untitled Design (28)

Untitled Design (28)

Sharad Pawar’s MP meets Modi : देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाची आणि चर्चेची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे लोकसभेतील सर्व आठ खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संसद भवनात ही बैठक होणार असून राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

मात्र या भेटीला केवळ शेतकरी आणि दुष्काळी प्रश्नांच्या चर्चेपुरतेच महत्त्व नसून तिच्याकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. पुढील आठवड्यात संसदेत मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधानांसोबतची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू असताना ही भेट होत असल्याने तिचे राजकीय परिणाम काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या भेटीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी “भेटीगाठींमध्ये काहीतरी शिजतंय” अशी प्रतिक्रिया देत राजकीय चर्चांना आणखी हवा दिली. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष किंवा नेता आघाडी सोडणार नसल्याचे स्पष्ट करत या भेटीला वेगळा अर्थ लावू नये, असे संकेत दिले.

मान्सूनची पुन्हा जोरदार एंट्री; मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या लोकसभेतील खासदारांमध्ये बारामतीच्या सुप्रिया सुळे, शिरूरचे डॉ. अमोल कोल्हे, माढाचे धैर्यशील मोहिते पाटील, दिंडोरीचे भास्कर भगरे, भिवंडीचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, बीडचे बजरंग सोनावणे, वर्ध्याचे अमर काळे आणि अहमदनगरचे निलेश लंके यांचा समावेश आहे.

दरम्यान, दिल्लीतील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत असून संसदेतही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके सादर करणार आहेत. यामध्ये केरळ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करण्यासंबंधीचे विधेयक तसेच राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक यांचा समावेश आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस लाठीमार प्रकरणावरून संसदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. त्यामुळे आजही संसदेत गदारोळ होणार की महत्त्वाच्या विधेयकांवर सुरळीत चर्चा होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या खासदारांची पंतप्रधानांसोबतची भेट आणि दुसरीकडे संसदेत होणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आज चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.

Exit mobile version