Download App

मणिपूरसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मिरमधून बड्या अधिकाऱ्याची रवानगी

Manipur : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. यादरम्यान, श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश बलवाल यांना मणिपूर केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. बलवाल हे दहशतवादाशी संबंधित प्रकरणे हाताळण्यात तज्ञ मानले जातात. बलवाल यांना डिसेंबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) कॅडरमध्ये पाठविण्यात आले होते. (Srinagar Senior Superintendent of Police Rakesh Balwal has been transferred back to the Manipur cadre)

मैतेई आणि आदिवासी कुकी समुदायांमध्ये या वर्षी मे महिन्यापासून हिंसक संघर्ष सुरू आहेत आणि राज्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. नुकतेच सोशल मीडियावर दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर तणाव आणखी वाढला आहे, ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. हीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राकेश बलवाल यांना मणिपूरमध्ये नवीन पोस्टिंग देण्यात येणार आहे. नुकतेच मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने बलवाल यांना AGMUT कॅडरमधून मणिपूर केडरमध्ये परत पाठवण्याच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

Manipur : मणिपुरात पुन्हा जाळपोळ! संतप्त जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग

बलवाल हे जम्मू-काश्मीरमधील उधमपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी मणिपूरमध्ये विविध पदांवर काम केले आहे. AGMUT कॅडरमध्ये जाण्यापूर्वी 2017 मध्ये ते चुराचंदपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक होते. त्यांनी ठोबल, इम्फाळसारख्या भागातही काम केले आहे. त्यानंतर राकेश यांनी श्रीनगरचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक म्हणून अशा वेळी पदभार स्वीकारला होता जेव्हा शहरात अल्पसंख्याकांच्या हत्या आणि पोलिसांवर हल्ले यासह अनेक दहशतवादी कारवाया होत होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर बलवाल यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले. मागील अनेक दिवसांपासून इथे अल्पसंख्याकांवर किंवा सुरक्षा दलांवर एकदाही हल्ले झालेले नाहीत.

केजरीवालांच्या अडचणीत वाढ, निवासस्थानाच्या नूतनीकरणप्रकरणी CBI चौकशी सुरू

राकेश यांच्या कार्यकाळात तीन दशकांनंतर श्रीनगरच्या रस्त्यावर मोहरमची मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली. शिवाय यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. त्यांच्या कार्यकाळातच G20 च्या टुरिझम वर्किंग ग्रुपचे आयोजन करण्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम शांततेत आयोजित केले गेले. बलवाल यांना अनेक पदकांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळातच मीरवाईज उमर फारुक यांना चार वर्षांनंतर नुकतीच नजरकैदेतून मुक्त करण्यात आले आणि त्यांना ऐतिहासिक जामा मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली. श्रीनगरचा पदभार स्वीकारण्यापूर्वी बलवाल हे साडेतीन वर्षे प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय तपास संस्थेत (एनआयए) पोलीस अधीक्षक होते. 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाऱ्या टीमचाही ते भाग होते.

Tags

follow us