Trinamool Congress: पश्चिम बंगालमधील सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष (Trinamool Congress) फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातील हकालपट्टी करण्यात आलेले नेते रिजू दत्ता (TMC leader Riju Dutta) यांनी मंगळवारी खळबळजनक दावा केला आहे. 80 आमदारांपैकी 50 आमदार आमच्याबरोबर असून, दोन-तृतीयांश बहुमत असल्याचा दावा दत्ता यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यावरून तृणमूल काँग्रेसमध्ये उघड बंड झाल्याचे समोर येत आहे.
व्हीआयपी अन् सरकारी अधिकाऱ्यांनाही भरावा लागणार टोल?, केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांची बैठक झाली होती. त्यांनी स्वतःच्या गटालाच “खरी तृणमूल काँग्रेस” असल्याचा दावा करत पक्षाचे निवडणूक चिन्हही आपल्याकडेच राहायला हवे, असे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही अशीच घडामोड घडली होती. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली आहे. सर्वाधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याने शिवसेना पक्ष त्यांचा झाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच झाले होते. ज्याच्याकडे सर्वाधिक आमदार त्याचा पक्ष असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मात्र तृणमूल काँग्रेसची त्याच दिशेने वाटचाल आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपबरोबर सत्तेत आहे. बंगालमध्ये तरी परिस्थिती सध्या तरी नाही कारण भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
सध्या बंगालमध्ये “शिवसेना महाराष्ट्र मॉडेल” लागू होत आहे. आमच्याकडे दोन-तृतीयांश बहुमत आहे. सुमारे 50 आमदार आमच्यासोबत आहेत. आम्हीच खरी टीएमसी आहोत. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून सोभनदेब चट्टोपाध्याय नव्हे तर ऋतब्रत बंदोपाध्याय यांची नियुक्ती व्हायला हवी, अशी मागणी दत्ता यांची आहे.
सिग्नेचर स्कँडल
हा वाद तथाकथित ‘सिग्नेचर स्कँडल’ (Signgate) मुळे निर्माण झालाय. टीएमसीमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बंदोपाध्याय आणि संदीपन साहा यांनी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवर त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या पश्चिम बंगाल सीआयडीकडून सुरू आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता नियुक्तीशी संबंधित कागदपत्रांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
टीएमसीतील फूट होणार? बैठकीला 61 आमदार गैरहजर
सोमवारी टीएमसीने संदीपन साहा आणि ऋतब्रत बंदोपाध्याय यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर पक्षाच्या 80 आमदारांपैकी 61 आमदार महत्त्वाच्या बैठकींना गैरहजर राहिल्याने आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या आमदारांनी बनावट स्वाक्षऱ्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर लगेचच त्यांच्यावर कारवाई झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ममता बॅनर्जींच्या नेतृत्वासमोर आव्हान?
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील संकटाला उत्तर देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी आंदोलन सुरू केले आहे. बंगालमधील टीएमसीमधील हा संघर्ष पुढे कोणते वळण घेतो आणि पक्षात महाराष्ट्रासारखी फूट पडते का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
