आग्रा : येथील प्रजापती ब्रह्मा कुमारी (Prajapati Brahma Kumari) आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकता (38) आणि शिखा (32) अशी दोघींची नावे आहेत. आत्महतेपूर्वी दोघांनी तीन पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. यात त्यांनी आत्महत्येसाठी संस्थेच्या चार जणांना जबाबदार धरले आहे. यासोबतच सुसाईड नोटमध्ये दोन्ही बहिणींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे आसारामसारखीच या आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ‘योगी जी, आसाराम बापूंसारख्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा द्या,’ असे त्यांनी लिहिले आहे. (Two sisters of Prajapati Brahma Kumari Ashram committed suicide)
याबाबत अधिक माहिती अशी की, एकता आणि शिखा यांनी आठ वर्षांपूर्वी ब्रह्मा कुमारीमध्ये दीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जगनेर येथे ब्रह्मा कुमारी केंद्र बांधले होते. तेव्हापासून दोघीही इथेच राहत होत्या. मृत बहिणींपैकी शिखाने एक पानी सुसाईड नोट लिहिली आहे, तर एकताने दोन पानी सुसाईड नोट लिहिली आहे. शिखाने सुसाईड नोटमध्ये दोन्ही बहिणी गेल्या एक वर्षापासून त्रस्त असल्याचे सांगितले आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आश्रमातील नीरज सिंघल, नीरजचे वडील, ग्वाल्हेर येथील आश्रमात राहणाऱ्या पूनम मोती झील आणि तिचे वडील ताराचंद यांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.
सुसाईड नोटमध्ये मृत बहिणींनी या चारही आरोपींवर पैशांचा अपहार तसेच अनैतिक कृत्ये केल्याचा आरोप केला आहे. खैरागढच्या पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी आग्रा बाहेरील आहेत, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये एकता आणि शिखा म्हणाल्या की, ‘आमच्यासोबत कोणी नाही, आम्ही एकटे आहोत, त्यामुळे हे पाऊल उचलले. पण मी माझे प्रिय बंधू सोनवीर आणि एन सिंह यांना विनंती करते की तुम्ही दोन्ही बहिणींच्या वतीने हा खटला लढवावा. तुम्ही आमच्या खऱ्या भावापेक्षा जास्त आहात. कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल, याला बहिणींची ओवाळणी समजावी. पण या चार नराधमांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
सर्व पुरावे आश्रमात ठेवले आहेत. त्याच्याकडे आमचे 25 लाख रुपये आहेत. यातील 7 लाख रुपये माझ्या वडिलांनी दिलेला प्लॉट विकून दिले होते. पैसे हडप करण्याबरोबरच ते महिलांसोबत अनैतिक कृत्ये करतात आणि त्यांना कोणीही काहीही करू शकत नाही असे सांगत दादागिरी करतात. कृपया आमचा गैरसमज करून घेऊ नका. आमची फसवणूक झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.