Download App

जुन्या साथीदाराकडून अखिलेश यादवांचा गेम : संजय सेठ यांची राज्यसभेच्या रणांगणात भाजपकडून ऐनवेळी एन्ट्री

लखनऊ : भाजपने अखेरच्या क्षणी मैदानात उतरविलेल्या संजय सेठ यांच्यामुळे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) राज्यसभा (Rajya Sabha) निवडणूक रंगतदार बनली आहे. सेठ यांच्या एन्ट्रीने दहा जागांसाठी आता 11 उमेदवार रिंगणात असणार आहेत. यात भाजपने (BJP) आठ तर समाजवादी पक्षाने (Samjwadi Party) तीन उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपच्या आठव्या उमेदवाराला विजयासाठी दहा मते कमी आहेत. तर समाजवादी पक्षाकडे अगदी काठावरची मते आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये आता आमदारांचा घोडेबाजार होण्याची शक्यात व्यक्त केली जात आहेत. (Uttar Pradesh Rajya Sabha Election 2024 Sanjay Seth BJP Akhilesh Yadav)

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 15 राज्यांमधील 56 जागांवर राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यात उत्तर प्रदेशमधील दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे सात आणि समाजवादी पक्षाचे तीन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. यानुसार भाजपने आधी आरपीएन सिंग, चौधरी तेजवीर सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, सुधांशू त्रिवेदी, साधना सिंग, नवीन जैन या सात जणांच्या उमेदवारीची घोषणा केली. तर समाजवादी पक्षाने जया बच्चन, रामजी सुमन आणि आलोक रंजन यांना तिकीट दिले.

हिंदी-इंग्रजी येत नाही म्हणून बाथरुममध्ये लपायचे, आव्हाडांनी अजितदादांची इज्जात काढली

दहा जागांसाठी दहाच उमेदवार असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे होती. मात्र भाजपने अखेरच्या क्षणी समाजवादी पक्षाचे माजी खासदार सेठ यांना आठवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले. त्यामुळे आता इथे 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एका उमेदवाराला निवडूण येण्यासाठी 37 मतांची आवश्यकता आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार आठव्या उमेदवारासाठी भाजपकडे 27 मते आहेत. त्यामुळे सेठ यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी 10 मतांची आवश्यकता आहे.

विधानसभेत सध्या भाजपचे 252 आमदार आहेत. तर अपना दलचे 13, राष्ट्रीय लोक दलाचे नऊ आमदार आहेत. यासोबतच निषाद पक्षाचे सहा आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचेही सहा आमदार आहेत. म्हणजेच भाजपकडे एकूण 286 मते आहेत. याचाच अर्थ भाजपकडे आठव्या उमेदवारासाठी 27 मते आहेत, तर 37 मतांची आवश्यकता आहे. मात्र सेठ यांच्यासाठी ही दहा मते गोळा करणे काहीसे कठीण दिसत आहे. कारण ज्या 27 आमदारांच्या जीवावर भाजपने आठवा उमेदवार रिंगणात उतरविला आहे, त्या 27 मतांमधीलच काही मते फुटण्याची भाजपला भीती आहे.

Gulabrao Patil : उद्धवसाहेबांचं पिल्लू ते राऊत नावाचं कार्टून; गुलाबराव पाटलांचा जोरदार हल्लाबोल

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे समाजवादी पक्षाची 2022 मधील चाल. गत विधानसभा निवडणुकीवेळी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाने एकत्र निवडणूक लढवली होती. यावेळी राष्ट्रीय लोक दलाच्या चिन्हावर अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचे काही उमेदवार उभे केले होते. त्यात आता राष्ट्रीय लोक दलाचे नऊपैकी चार आमदार समाजवादी पक्षाचे आहेत. याशिवाय सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या चिन्हावरही समाजवादी पक्षाचे तीन आमदार निवडून आले आहेत. हेही आमदार फुटण्याची ओपी राजभर यांना भीती आहे. बसपाचे एक मत अजूनही संभ्रमात आहे.

सपाकडे किती मते आहेत?

समाजवादी पक्षाकडे तुरुंगात असलेल्या आमदारांसह 108 मते आहेत. तर काँग्रेसकडे दोन मते आहेत. त्यामुळे तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी आणखी एका मताची गरज आहे. मात्र इथेही एक घोळ आहे. अपना दलच्या पल्लवी पटेल यांनी समाजवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या होत्या. सध्या त्या समाजवादी पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पल्लवी पटेल यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मत न दिल्यास आणि दोन मते कमी पडू शकतात. त्यासोबतच तुरुंगात असलेले आमदार आले नाहीत तर कदाचित चार मते कमी पडू शकतात. त्यामुळेच सध्या उत्तर प्रदेशमधील राज्यसभा निवडणूक रंगतदार बनली आहे.

follow us

वेब स्टोरीज