Alaknanda River Accident : उत्तराखंडमधील चमोली येथे मोठा अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीवरील ‘नमामि गंगे’ प्रकल्पाठिकाणी टान्सफॉर्मचा स्फोट होऊन चार पोलिस कर्मचाऱ्यांसह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती चमोलीच्या एसपींनी दिली आहे. घटनेची भीषणता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये एक पोलिस उपनिरीक्षक आणि 3 होमगार्ड कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
Uttarakhand | 10 people died and several injured after a transformer exploded on the banks of the Alaknanda River in the Chamoli district. Injured have been admitted to the district hospital: SP Chamoli Parmendra Doval
— ANI (@ANI) July 19, 2023
उत्तराखंडमधील मुसळधार पावसानंतर चमोली, हरिद्वार, रुद्रप्रयागसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम असून, आज (दि. 19) चमोली येथील अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. यानंतर घटनास्थळावर विजेचा करंट पसरल्याने 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी सांगितले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, जखमींना जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघातावेळी 24 लोक घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती समोर आली असून, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
उत्तराखंडमध्ये संततधार पाऊस
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असून, गंगेसह इतर सर्व नद्यांना पूर आला आहे. डोंगराळ भागातील धरणातून सातत्याने पाणी सोडले जात असल्याने हरिद्वार आणि ऋषिकेशमध्येही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हरिद्वारमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी 293 मीटरवर पोहोचली असून ती धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. अशा परिस्थितीत गंगा नदीलगतच्या भागात पुराचा धोका कायम आहे.
कसा झाला अपघात
रात्री येथे राहणाऱ्या केअरटेकरचा फोन सकाळी वाजत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन शोधाशोध केली. त्यानंतर केअरटेकरचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे समोर आले. माहिती मिळताच कुटुंबीयांसह अनेक ग्रामस्थही घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तपास सुरू असताना पुन्हा विद्युत प्रवाह पसरला. यात अनेकांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.