Download App

सामंतांचा परदेश दौरा खटकला! ठाकरे म्हणाले, दाव्होसला ट्रॅफिकचे कोन लावायला जाणार का?

Aditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. सीएम शिंदे 1 ऑक्टोबरपासून दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक हा दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्याबरोबर जाणार होते. आदित्य ठाकरे (Aditya Thackray) यांनी या दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्याची सरकारला भीती आहे. त्यामुळेच हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या परदेशदौऱ्यावरून खोचक टीका केली आहे.

ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आमचा कुठेही वैयक्तिक वाद नाही. परंतु, जनतेच्या पैशांवर यांनी सहलीला जाऊ नये असं आमचं म्हणणं आहे. आता उद्योगमंत्री उदय सामंत लंडनला जाणार आहेत. तिथे म्हणे गोलमेज परिषद होणार आहे. परंतु, ही गोलमेज परिषद कोणाबरोबर असणार आहे, या सहलीतून राज्याला किती गुंतवणूक मिळणार हे राज्यातील लोकांना समजलं पाहिजे.

Maratha Reservation : मराठ्यांनो, छगन भुजबळला ताकद देऊ नका; जरांगे पाटलांनी साधला निशाणा

उद्योगमंत्री तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषदेत जाऊन चर्चा करणार आहेत असे सांगितले जात आहे. पंरतु, येथे सरकारच आर्टिफिशियल आहेत. दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी सामंत दाव्होसमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. ज्या दाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे लोक येत नाहीत तिथे जाऊन कशाची पाहणी करणार आहात?, असा रोखठोक सवाल ठाकरे यांनी केला. तिथे हे काय ट्रॅफिकचे कोन लावायला जाणार आहात का?, पालकमंत्री म्हणून आधी आपल्या जिल्ह्यात पाहणी करा. जनतेच्या पैशांवर सहली करू नयेत असे आमचे मत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिंदे-नार्वेकरांचे दौरे रद्द

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आपला घाना देशाचा दौरा रद्द केला. मी योग्य प्रश्न विचारताच, बेकायदा मुख्यमंत्र्यांप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी आपला परदेश दौरा रद्द केला. नार्वेकर जी ह्यांच्या वेळकाढूपणामुळे महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या होत असताना ते राष्ट्रकुल संसदीय परिषदेला निघाले होते. हाच मोठा विनोद होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात विलंब का होतोय, याचे उत्तर नार्वेकर जी यांनी महाराष्ट्राला आधी द्यावे. त्यांची निष्क्रियता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या लोकशाहीवर आणि मतदानाच्या शक्तीवर विश्वास असलेल्या प्रत्येकावर अन्याय करणारी आहे, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी काल केले होते.

कोकणात दोन वाघ आमने-सामने : पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरुन रामदास कदम-भास्कर जाधव भिडले

Tags

follow us