Kiran Kale : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या अहिल्यानगरचे (Ahilyanagar) शहरप्रमुख किरण काळे (Kiran Kale) यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका पीडित विवाहितेने याबाबत नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) तक्रार दाखल केली असून, आरोपी किरण काळेला पोलिसांनी मध्यरात्री अटक करून ताब्यात घेतलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी किरण काळे यांनी नगर महानगर पालिकेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. तसेच याबाबत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील पुरावे दिले होते. त्यामुळेच त्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आले असल्याचे ठाकरे गटाचे पदाधिकारी सांगतायत.
मदतीच्या बहाण्याने अत्याचार केला…
पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये अनेक दिवसांपासून वाद होत असल्याचे तिने फिर्यादीमध्ये म्हंटले. या वादात मध्यस्थी करण्याच्या निमित्ताने किरण काळे यांच्या संपर्कात आपण आलो. 2023 ते 2024 या कालावधीत शहरप्रमुख काळे यांनी आपल्या कार्यालयात तिच्यावर वारंवार अत्याचार केला. इतकंच नाही, तर ही माहिती इतरांना कळू नये म्हणून जीवे मारण्याची धमकीही दिली, असं तक्रारीत नमूद आहे. तक्रार दिल्यानंतर पीडित महिलेने विष घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या वैद्यकीय देखरेखेत उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रकरणाची दाखल घेत पोलिसांनी काळे यांना तातडीने अटक केली आहे. यामुळे मात्र जिल्ह्यात एकच राजकीय खळबळ उडालीय.
कोट्यवधींच्या घोटाळ्याची केली होती पोलखोल
काही दिवसांपूर्वीच नगर शहरातील रस्ते विकास कामांमधील गैरव्यवहारासंदर्भात तसेच घोटाळ्यासंदर्भात किरण काळे यांनी धक्कादायक माहिती समोर आणली होती. काळे यांनी अलीकडेच अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या अंदाजे 400 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप जनतेसमोर मांडले होते. विशेष म्हणजे याबाबत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर थेट आरोप देखील केला होता. आमदार जगताप यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मनपाचा घोटाळा व त्यानंतर अत्याचाराच्या प्रकरणात काळे यांच्यावर झालेली कारवाई पाहता राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागल्यात.
मोठी बातमी, 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आठवा वेतन; ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा
काळेंच्या मदतीसाठी ठाकरे गट मैदानात
काळे यांनी अलीकडेच अहिल्यानगर महानगरपालिकेतील काही रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या कोट्यवधी कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप जनतेसमोर मांडले. याच पार्श्वभूमीवर नगर कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्यात आली, ही बाब अत्यंत धक्कादायक, अन्यायकारक कारवाई असल्याचे ठाकरे शिवसेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी मत व्यक्त केले. दरम्यान आता याप्रकरणी पुढे काय काय पत्ते उलगडणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.