Download App

Ahmadnagar Politics: दिवाळी फराळाला निवडणुकीचा ‘वास’

Ahmadnagar Politics : दिवाळीचा सणोत्सव सध्या राज्यात सुरु असून राजकीय नेतेदेखील यंदाची दिवाळी चांगलीच गाजवू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे दिवाळी फराळाचे कार्यक्रम हे सध्या जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र निमित्त जरी दिवाळी फराळाचे असले तरी या फराळाला मात्र निवडणुकीचा वास येऊ लागला असल्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे दिवाळीचा फराळ आयोजित करणारे नेते मंडळी आपल्या राजकीय समर्थक आणि विरोधकांनाही आमंत्रण देतअसल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांचे गणित यामाध्यमातून जुळवली जात असल्याचे दिसू लागले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रंगलेल्या या दिवाळी फराळाला नेतेमंडळी हजेरी लावत आहे. याद्वारे एकप्रकारे शक्तिप्रदर्शन सुरु आहे तर दुसरीकडे आपले स्पर्धक व विरोधक असलेल्या नेत्यांविरोधात राजकीय फटकेबाजी देखील करत आहे.

Maratha Reservation : मंत्री असून तुमचं ऐकलं जात नाही; भुजबळांच्या ‘त्या’ आरोपाचा रोहित पवारांकडून समाचार

फराळाद्वारे नेतेमंडळींकडून मतपेटीची चाचपणी
आगामी काळात राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने त्या चांगल्याच गाजणार असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात निर्माण झाले आहे. तत्पूर्वी येणाऱ्या यंदाच्या दिवाळी फराळाच्या निमित्ताने राजकीय नेते मंडळी आपले निवडणुकांचे राजकीय समीकरण जुळवताना दिसून येत आहेत. याचबरोबर फराळाच्या निमित्ताने आलेली मंडळी आपल्या आमदार नेत्यांबरोबर फोटो, सेल्फी घेत ती सोशल मीडियावर व्हायरल करत आहे.

लोकप्रतिनिधींकडून देखील कार्यक्रत्यांसह आपापल्या मतदार संघातील जनतेला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणारी आदरतिथ्य यातून कार्यकर्ते मतदार यांनाही मोठे समाधान मिळताना दिसून येते. यांच्याद्वारे नेते मंडळींना आपला चहाता वर्ग किती आहे व निवडणुकांच्या अनुषंगाने आपली मतपेटी कशी भरेल याची चाचपणी देखील सुरु आहे.

मराठा अन् धनगर आरक्षणाची चर्चा थेट राष्ट्रपती भवनात! ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतली मु्र्मूंची भेट

सोयरे-धायरे एकाच पंगतीला
नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले, हंगा (पारनेर)मध्ये आमदार निलेश लंके तसेच चौंडीत (जामखेड) मध्ये आमदार राम शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली होती. यातच शिवाजी कर्डिलें यांचे दिवाळी फराळ यावर्षीचे आकर्षण ठरले. यावेळी विखे पित्रापुत्र व जगताप पिता-पुत्र यांनी हजेरी लावली. यावेळी विखे पिता-पुत्राच्या शेजारी बसून कर्डिले-जगताप व्याही यांनी फराळाचा आस्वाद घेतला.

जिल्ह्यातील दिग्गज नेते एकाच रांगेत बसून सर्वसामान्यांसारखे मंडपात बसून दिवाळी फराळाच्या निमित्ताने आस्वाद घेतला. यावेळी राजकीय जुळवाजुळव केली जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच खासदार विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांना आपल्या पक्षात येण्यासाठी निमंत्रित केले होते. यामुळे यंदाच्या फराळाला निवडणुकीचा वास येऊ लागला आहे.

Manoj Jarange : सासरवाडीत का राहतो? भुजबळांच्या टीकेला जरांगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर

शिंदे-लंकेचा फराळ
जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आमदार राम शिंदे यांच्या चौंडी गावातील तसेच आमदार नीलेश लंके यांच्या हंगा गावात आमदारांनी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान शिंदे यांच्या चौंडी या गावी जात आमदार लंके यांनी फराळाचा आस्वाद घेतला. दरम्यान संध्याकाळी आमदार शिंदे यांनी देखील हांगा येथे जात लंके यांच्या दिवाळी फराळाला आपली उपस्थित दर्शवली. शिंदे यांच्यासोबतच कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित शिंदे यांनी यावेळी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली.

फराळ कार्यक्रमाला निवडणुकीची जोड
जिल्ह्यातील दिवाळी फराळाला अनेक नेते मंडळींनी आवर्जून उपस्थिती लावत फराळाचा स्वाद घेतला. याचबरोबर या निमित्ताने अनेक नवीन राजकीय समीकरणं उदयाला येत आहेत का ? याचीही चर्चा आता जिल्हाभर रंगू लागली आहे. मात्र यंदाच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला पुढील वर्षी असणाऱ्या निवडणुकांची जोड असल्याने दिवाळी फराळाचे कार्यक्रम यंदा जोरदार असल्याचे दिसून येत आहे. तर एकूणच कारण जरी दिवाळी फराळाचे असले तरी यानिमित्ताने जिल्ह्यातील राजकारणात भविष्यात राजकीय बॉम्ब फुटणार का? अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.

Tags

follow us