Ajit Pawar हे राजकारणातील स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. जे पोटात तेच ओठात, असे बोलणारे जे कोणी नेते आहेत, त्यात त्यांचा समावेश होतो. अजित पवार यांनी एखादे काम होणार असे सांगितले असेल तर ते होतेच आणि त्यांनी जर नाही म्हटले तर मग ते कोणीच करू शकणार नाही, अशी ख्याती त्यांनी कमावली आहे. पण हेच अजित पवार गेले काही दिवस एका प्रश्नावर थेटपणे बोलत नाहीत. सांगत नाहीत. ते स्पष्टपणे न बोलण्याने त्यांचे राजकीय नुकसान होण्याचा धोका अनेकांना वाटतो आहे.
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. राज्यात २०१९ पासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. बाजारातील गप्पा किंवा अफवा म्हणून ज्या एकेकाळी संभावना केली गेली असती, अशा बाबी प्रत्यक्षात उतरल्या आहेत. त्यामुळे या अफवांनाही गंभीरतेने घेण्याची वेळ आली आहे. या वेळची अफवा आहे ती अजित पवार यांच्यासंदर्भातच.
सर्वोच्च न्यायालयात राज्यातील शिंदे सरकारच्या स्थापनेविषयीचा निकाल कधीही येऊ शकतो. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदार अपात्र ठरण्याचा धोका आहे. तसे झाले तर अजित पवार हे संकटमोचक म्हणून भाजपशी हातमिळवणी करू शकतात, अशी एक अफवा आहे. दुसरी अफवा म्हणजे न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्या बाजूने लागला तरी अजित पवार हे आता भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
जो तो आपापले कथित सूत्र वापरून अनेक पुड्या सोडून किंवा अंदाज बांधून या चर्चेत आणखी खतपाणी घालत आहे. अजित पवारांसोबत १७ आमदार आहेत तर कोण म्हणतय २० आमदार आहे. (राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पाडायची असेल तर अजितदादांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असेल. पण राष्ट्रवादीच भाजपसोबत जाणार असेल तर पक्षांतरबंदी कायद्याच्या नियमांचा प्रश्नच मिटला.) अजितदादांनी गेल्या शुक्रवारी आपले कार्यक्रम काय रद्द केले तर अनेकांनी थेट त्यांच्या शपथविधीची तारीखही सांगितली. शिंदे यांचे पद गेले तर, अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असेही काहींनी भाकीत वर्तवले.
या साऱ्या बाबींवर अजित पवारांना विचारले असता त्यांनी माझी बदनामी करू नका. खात्री करून बातमी देत जा, असा सल्ला दिला. मी आजारी असल्याने कार्यक्रम रद्द केले, असे सांगितले. पण मी भाजपसोबत जाणार नाही नाही नाही.. असे काही ते ठामपणे बोलले नाही. माझी भूमिका ही पुरोगामी महाराष्ट्राची आहे, असा पण दावा ते करत नाहीत. म्हणजे भाजपशी वैचारिक मतभेद असल्याचेही ते दाखवून देत नाहीत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी भक्कम असल्याचे सांगितले. पण हे सांगताना कोणी नेता आमची साथ सोडून गेला तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल असेही सांगून टाकले. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आलबेल नसल्याचे संकेत गेले.
राजकारणात काही बाबी गोपनीय ठेवाव्या लागतात, हे कोणालाही समजू शकेल. पण आपली विश्वासर्हता पणाला लागलेली असताना त्याविषयी स्पष्ट न बोलणे हे साहजिकच संशय वाढविणारे असते. त्यामुळेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांच्या मनात काय आहे, याचा अंदाज येत नसल्याने अनेकांनी अजित पवार हे आज ना उद्या भाजपसोबत जाणार असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
अविश्रांत काम कामाचा ताण, मुख्यमंत्री पडले आजारी; राजकीय चर्चांना उधाण
त्यात अजित पवार हे मोदी सरकारवरील टीका टाळत आहेत. विरोधी पक्षनेते असूनही मंत्रीमंडळातील एखाद्या नेत्याला थेट टार्गेट करण्याचे धाडस त्यांनी दाखवलेले नाही. त्यामुळे अजित पवारांच्या मनात काय आहे, याचा थांगपत्ता लागत नाही. दुसरीकडे भाजपचे नेतेही संदिग्ध विधाने करत आहेत. साहजिकच राजकीय धुरळा जोरात सुरू आहे. अजित पवार यांचे अधुनमधून गायब होणे, फडणवीस यांच्यासोबत सकाळचा शपथविधी (त्यावर त्यांनी मौन कायम ठेवले आहे.) ते राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा या साऱ्या बाबींमुळे ते शरद पवारांची साथ सोडणार असे बोलले जाते. किंवा शरद पवारांचाच यामागे काही हात असेल असेही नंतर सांगितले जाईल. अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा सर्वज्ञात असल्याने त्या पदासाठी ते आता करो या मरो
च्या भूमिकेत आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच हा धुरळा उडत असावा. त्याचा ते आनंद घेत असावेत.