Chandrashekhar Bawankule : पुण्यातील पत्रकार परिषदेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शेतकरी, जमीन नोंदणी, आदिवासी शेतकरी, कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर महत्त्वाची माहिती दिली. ज्यांच्या ताब्यात शेती आहे, मात्र त्यांच्या नावावर जमीन नोंदणीकृत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत राज्यातील 2 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड काढण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. आदिवासी समाजातीलही सात हजारांहून अधिक शेतकरी जमीन कसत आहेत, मात्र त्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड किंवा योग्य नोंदी नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा शेतकऱ्यांनाही या प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार आहे.
जमीन संपादनातील वाद टाळण्यासाठी नवा निर्णय
एका सातबाऱ्यावर अनेक भावंडांची किंवा वेगवेगळ्या व्यक्तींची नावे असतील आणि जमीन संपादनाची प्रक्रिया झाली, तर भरपाईची रक्कम एकत्रित निघाल्याने वाद निर्माण होतात. हे टाळण्यासाठी मोबदला वाटपाची प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात जमीन संपादनानंतर मोबदल्यावरून होणारे वाद कमी होतील, असा दावा त्यांनी केला.
नोंदणी कार्यालयांचे आधुनिकीकरण
नोंदणी आणि मुद्रांक विभागात सात मॉडेल कार्यालये उभारण्यात येत असून, 20 ऑगस्टपासून पुण्यातून या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यात मायक्रो झोनिंग लागू करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे रेडी रेकनरमधील दर अधिक अचूक पद्धतीने निश्चित करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जमीन मोजणीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नोंदणी करता येणार नाही, अशी व्यवस्था करण्याच्या दिशेने सरकार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आधार कार्ड जोडणीमुळे दस्त नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे म्हणाले.
जरांगे यांच्या टीकेवर बावनकुळे म्हणाले…
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या टीकेबाबत विचारले असता बावनकुळे यांनी, “माझ्यावर टीका करून कोणाला आनंद मिळत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी,” अशी भूमिका मांडली. महसूल विभागाने मोठ्या प्रमाणावर कुणबी जात प्रमाणपत्रे दिली असून, एखाद्या प्रमाणपत्रावरून गैरसमज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या वैधतेचा विषय महसूल विभागाच्या अखत्यारित नसून तो समाजकल्याण विभागाशी संबंधित असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ओबीसी आंदोलकांना रस्त्यावर आंदोलन न करण्याचे आवाहन
मराठा आणि ओबीसी समाजातील वादाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी दोन्ही समाजांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. ओबीसी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये. अशा आंदोलनांमुळे सामाजिक संघर्ष आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.
Manoj Jarange Patil : ‘वर्षा’ वर आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
“मराठ्यांच्या ताटातील ओबीसींना आणि ओबीसींच्या ताटातील मराठ्यांना काहीही द्यायचे नाही. दोन्ही समाजांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
संजय राऊतांवरही निशाणा
संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पक्षातील आमदार का फुटले, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले. पक्षनेतृत्वाकडून आमदारांना पुरेसा आधार मिळत नसल्याने परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. अमित शाह यांच्या संदर्भातील टीकेवरही बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. केंद्र आणि राज्यातील नेते कोणत्याही पदासाठी काम करत नसून, देश आणि राज्याच्या हितासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंढवा जमीन प्रकरणावरही भाष्य
मुंढवा जमीन प्रकरणाचा तपास आपण स्वतः केल्यास त्याला राजकीय रंग येऊ शकतो, त्यामुळे हे प्रकरण अपर मुख्य सचिवांकडे सोपवण्यात आले आहे. संबंधित जमीन सरकार जमा झाली असून, पुढील निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
नोकरी, EMI नाही तर… एका भीतीने उडवली 94% कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची झोप; सर्वेक्षणातून खुलासा
तसेच जमीन घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तींना संबंधित विभागात नोकरी करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. भविष्यात राज्यात मुंढवा जमीन घोटाळ्यासारखे प्रकार होऊ नयेत, यासाठी सरकार कठोर पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.
