Lok Sabha : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) आपल्या सर्व लोकसभा खासदारांना गुरुवारी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप (Whip) जारी केला आहे. भाजपने जारी केलेल्या व्हीपमध्ये 13 आणि 14 डिसेंबर रोजी दोन्ही सभागृहात काही महत्त्वाच्या विधी कामांवर चर्चा होणार असल्याने सर्व खासदारांनी दोन्ही दिवशी सभागृहात उपस्थित राहावे असं सांगण्यात आले आहे. तर काँग्रेसने जारी केलेल्या आपल्या व्हीपमध्ये लोकसभा खासदारांना 13 आणि 14 डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन दिवस चर्चा करण्याची विनंती केली.
राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे की, संविधानाचा स्वीकार केल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन दिवसीय चर्चेची विनंती करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. यामुळे सेंट्रल हॉलमध्ये आज आयोजित संविधान सभा या विशेष कार्यक्रम पुढे जाऊ शकेल. हा ऐतिहासिक प्रसंग सर्व संसद सदस्यांना डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या वारशावर एकत्रितपणे चिंतन करण्याची अमूल्य संधी प्रदान करतो. असं राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
पुढे राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वीही अशा विशेष चर्चेची अनेक उदाहरणे आहेत. 2015 मध्ये, दोन्ही सभागृहांनी 26 नोव्हेंबर रोजी डॉ. आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दोन दिवस, 13 तास चर्चा केली. 9 ऑगस्ट 2017 रोजी भारत छोडो आंदोलनाचा 75 वा वर्धापन दिन आणि 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आम्ही दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा केली होती. असं देखील राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.
डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा ‘राजा’, जिंकली जागतिक स्पर्धा
दोन्ही सभागृहात दोन दिवस संविधानावर चर्चा होणार
13-14 डिसेंबरला लोकसभेत आणि 16-17 डिसेंबरला राज्यसभेत चर्चा होईल. 13 आणि 14 डिसेंबरला संविधानाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त लोकसभेत चर्चा होणार आहे. यानंतर 14 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. 16 आणि 17 डिसेंबर रोजी राज्यसभेत खासदार या विषयावर चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत चर्चेला सुरुवात करणार आहेत.