नवी दिल्ली : छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Chief Minister K Chandrasekhar Rao) यांची प्रगती भवन येथे भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चेंना उधाण आलंय.
या भेटीसंदर्भात संभाजी राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली. पण त्यांच्या या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे.
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर महाराष्ट्रातही तिसरी आघाडी होतीय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीची माहिती स्वतः संभाजी राजे यांनी सोशल मीडियावर दिली आहे. ‘तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली.’ असे संभाजी राजे यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे.
नांदेडमध्ये के. चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. या सभेसाठी त्यांनी राजेंची भेट घेतली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण के. चंद्रशेखर राव यांचा मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये प्रभाव आहे.
काय म्हणाले संभाजी राजे?
राव यांनी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता अथवा केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्य न करता जनहित व राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून व्यापक कार्य आपल्या राज्यात केले आहे.
राव यांनी गेल्या १४ वर्षांत तेलंगणा राज्यात विकासाची गंगा आणली आहे. त्यांचे कृषीधोरण, जनधोरण, सिंचन योजना, गरीब व वंचितांसाठी आखलेल्या विविध योजना व शिक्षण पद्धती या संपूर्ण देशासाठी मार्गदर्शन व आदर्शवत आहेत.
त्यांच्या या योजना व कार्यपद्धती याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. श्री राव हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्यामाध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे अत्यंत ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहेत.
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. pic.twitter.com/jZLrO282ed
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 26, 2023
त्यांनी आपल्या निवासस्थानी अगदी आपुलकीने आदरातिथ्य केले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना पूर्ण अभ्यास असून महाराजांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदरभाव जाणवला. यावेळी श्री राव यांना राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला.