Download App

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू, बदल्याचे अन् सुडाचे राजकारण होणार नाही, CM फडणवीसांची ग्वाही…

महाराष्ट्राला अधिक प्रगतिशील करत अधिक विकासाच्या गतीने पुढे नेऊ तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू - मुख्यमंत्री फडणवीस

  • Written By: Last Updated:

मुंबई – महायुतीचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार मंत्रालयात आल्यानंतर मंत्रालयात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ परंपरेनुसार मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राला अधिक प्रगतिशील करत अधिक विकासाच्या गतीने पुढे नेऊ तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून बदल्याचे, कुरघुडीचे आणि सुडाचे राजकारण होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

लाडकी बहीण योजना सुरुच राहणार, पण …, पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य 

महाराष्ट्र सर्वात पुढे राहील…

पत्रकार हे लोकशाही व्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातील राज्याचा कारभार चालतो. गेल्या अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं. अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होतं. आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची ऍडव्हर्टिसमेंट चालली होती. त्यात मला कोणीतरी विचारलं की, महाराष्ट्र थांबणार नाही, असं तुम्ही का म्हणताय? मी त्यांना समजावून सांगितलं अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे. आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ. आता महाराष्ट्र थांबणार नाही… त्या गतीने प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्र असो उद्योग क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला.

जरी आमचे रोल बदलले असले तरी मी 2014 ला मुख्यमंत्री होतो. शिंदे साहेब आमच्यासोबत होते. 2019 ला मी 72 तासांचा मुख्यमंत्री होतो. मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते. मी उपमुख्यमंत्री होतो. आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे. शिंदे साहेब उप मुख्यमंत्री आहेत, असं फडणवीस म्हणाले.

सर्व घटकांना न्याय देणार
पुढील पाच वर्षात राज्याला पुढे नेणार. राज्यातील विविध क्षेत्रात सामाजिक, पायाभूत, सांस्कृतिक या क्षेत्रात राज्यातील प्रगतिशील काम करणार. अनेक विकासकामं घेऊन पुढे जाणार, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

तब्बल 10 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे…आता शिंदे, शिवसेना पुन्हा पेचात 

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणार

मागील काही वर्षात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. खासकरून 2022 नंतर गृहमंत्री आपल्याकडे आहे आणि आपल्यावर मोठी टीका झाली, याविषयी विचारले असता फडणीस म्हणाले की, जो गृहमंत्री असतो त्याच्यावर टीकाही होत असते. यामध्ये धन्यवाद कमी आणि शिव्या जास्त मिळतात. परंतु आता राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू. कोणत्याही अनुचित घटना घडणार नाहीत. तसेच याच्या आधी जे कुरघुडीचे राजकारण घडलं, सूडाचे राजकारण घडले. ते कोणतेही सुडाचे राजकारण किंवा कुरघुडीचे राजकारण आता होणार नाही. मी शपथविधीसाठी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना फोन केला होता. त्यांनी माझ्या अभिनंदन केले. परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. महाराष्ट्र राज्यात राजकीय पक्षांमध्ये संवाद असतो. बाकीच्या राज्यामध्ये विसंवाद असतो. तसे महाराष्ट्रात होणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र थांबणार नाही..

गेल्या सरकारमध्ये वेगवेगळे निर्णय झाले. हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आमचा प्रयत्न असणार आहे की, आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासन दिलेली आहेत. ती आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं आम्हाला उचलायची आहेत. आणि त्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन दिलेली सगळी आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासन करु इच्छितो की, एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं हे सरकार आहे. हे महाराष्ट्रात पुढच्याही काळात पाहायला मिळेल. अडचणी अनेक येतात, पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू, हा विश्वास मला आहे, असं फडणवीस म्हणाले.

 

follow us