CM देवेंद्र फडणवीस कामाला लागले! पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

  • Written By: Published:
CM देवेंद्र फडणवीस कामाला लागले!  पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर पहिल्या तासातच महायुतीची (Mahayuti) पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात झाली. यावेळी बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या (Chief Minister’s Relief Fund) फाईलवर केली.

CM देवेंद्र फडणवीस कामाला लागले! पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर 

शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत फडणवीस कोणता पहिला निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होतं. फडणवीस यांनी पुण्यातील रुग्णासाठी पहिला निर्णय घेतला. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये देण्याच्या निर्णयावर फडणवीस यांनी स्वाक्षरी केली.

कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीची विनंती केली होती. त्यावर फडणवीसांनी सही केली. आपल्या सीएम पदाचा कार्यकाळ फडणवीस यांनी एका गरजू रुग्णाला आर्थिक मदत करून सुरू केला.

फडणवीसांच्या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर होते. त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दित शेकडो रुग्णांना सीएम फंडातून मदत करण्यात आली. शिंदेंची हीच परंपरा फडणवीस पुढे चालवताना दिसत आहेत. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची जबाबदारी सक्षमपणे हाताळली होती.

अधिक वेगाने काम करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर पहिल्याच बैठकीत ते ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांनी प्रशासनाला अधिक वेगाने काम करण्याचे निर्देश दिले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करावे लागेल, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आता गती वाढवू आणि अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन शाश्वत विकास कसा साध्य करता येईल, त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करू, असंही ते म्हणाले.

लोकाभिमुख सरकार पाहायला मिळेल
मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील निर्णय जाहीर केले. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते. यात ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय यापुढेही कायम राहणार. भविष्यात सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारे लोकाभिमुख सरकार पाहायला मिळेल, असं ते म्हणाले. नव्या सरकारची ही पहिलीच पत्रकार परिषद होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube