Vijay Wadettiwar on Sharad Pawar Statement : शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते सुखावले असून शरद पवारांच्या वक्तव्याला पाठिंबा देण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. आताही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचे जाहीर कौतुक केले आहे. शरद पवार जे बोलले त्यात तथ्य आहे. त्यांच्यासारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी दूरवरचा अभ्यास करूनच बोलत असतात, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी पाठिंबा व्यक्त केला.
वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवारांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचेच आहेत आणि गांधी विचार कणी संपवू शकत नाही. अवकाळी पावसासारखे काही पक्ष सत्तेत येतात. पण काँग्रेस हा नियमित पाऊस आहे. अवकाळी पाऊस येतो शेतकऱ्यांचं नुकसान करून जातो. तशी आजच्या राज्यकर्त्यांची परिस्थिती आहे. काँग्रेस हा निरंतर वाहणारा पक्ष आहे. त्याला समुद्र म्हणता येईल. ज्या विचाराने हा पक्ष उभा राहिला आहे. तो मानवतेचा विचार आहे. येथे धर्मांधता आणि जातियतेला थारा नाही.
या देशाचा विकासाचा अजेंडा राहिला आहे. देश एकसंघ राहावा हीच काँग्रेसची भूमिका राहिली आहे. त्यामुळे आताच्या भाजप सरकारला बदलण्याची देशाची मानसिकता झाली आहे. या निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यात तथ्य आहे. पवार साहेबांसारखे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी फार दूरवरचा विचार करून ते बोलत असतात. त्यामुळे मला वाटतं की २०२४ मध्ये सत्ता परिवर्तन होईल. भरकटलेले जे काही पक्ष आहेत जे दबावामुळे दुसरीकडे गेले आहेत ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील.
पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत राहून चांगल्या समन्वयाने काम करतील. यातील काही प्रादेशिक पक्ष त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लागू होत नाही का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, मला राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात कोणताच फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारसरणी मानणारे आहोत.
आरएसएस अन् हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक.. राऊतांनी नेमकं काय सांगितलं ?