“काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल… सगळं कसं एकदम ओके आहे.” या एकाच लाईनवर सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) अख्खा देशात फेमस झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावेळी गुवाहटीला गेलेल्या बापूंचे सगळे ओके होते. पण आता विधानसभा निवडणुकीत बापूंचे काही ओके दिसत नाही. गतवेळी अवघ्या 768 मतांनी जिंकलेल्या बापूंना मतदारसंघात यंदाही ‘लाल वादळा’चे आव्हान असणार आहे. पण महायुतीतही बापूंसाठी तगडी फाईट आहे. नेमकी ही फाईट कशी आहे आणि शेकाप यंदा बालेकिल्ल्यात कशी ताकद लावणार? (Deepak Salunkhe Vs Shahajibapu Patil Vs Babasaheb Deshmukh Will Fight In Sangola Assembly Constituency?)
1962 या पहिल्या निवडणुकीपासून 1972 आणि 1995 चे दोन अपवाद वगळता 2019 पर्यंत सांगोला मतदारसंघावर गणपतराव देशमुख यांचाच दबदबा होता. 1972 मध्ये काँग्रेसच्या काकासाहेब साळुंखे-पाटील आणि 1995 मध्ये काँग्रेसच्या शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. इतर सर्व निवडणुकांमध्ये गणपत आबा देशमुख यांनी शेकापचा लाल झेंडा कायमच फडकवत ठेवला. तब्बल अकरा वेळा निवडून येणे हा त्यांचा एक विक्रमच आहे. या काळात त्यांची एकदा मंत्रिपदाही वर्णी लागली होती.
सांगोल्यामधील गत तीन निवडणुकांची माहिती बघितल्यास 2009 च्या निवडणुकीत गणपत देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांचा सहज पराभव केला. शहाजीबापू काँग्रेस पक्षाकडून मैदानात होते. त्यांना 76 हजार 744 मते मिळाली होती. तर देशमुख यांना 86 हजार 548 मते मिळाली होती. 2014 मध्ये शहाजीबापू यांनी पक्ष बदलला आणि शिवसेनेचा भगवा घेतला. 2014 लाही गणपत देशमुख यांनी शहाजीबापू यांचा पराभव केला. त्यांना 94 हजार 374 मते मिळाली होती. तर शहाजीबापू यांना 69 हजार 150 मते मिळाली होती.
पण 2019 च्या विधानसभेपूर्वी गणपत आबांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली. त्यांनी नातू डॉ. अनिकेत यांना राजकारणात आणले आणि तिकीटही मिळवून दिले. अनिकेत यांनी शिवसेनाच्या शहाजीबापूंना टफ फाईट दिली. पण पाटील यांनी डॉ. अनिकेत देशमुखांचा अवघ्या 768 मतांनी पराभव करत शेकापचा गड ढासळवला.
आता यंदाची निवडणूकही बापूंसाठी सोपी आहे, असे नाही. लोकसभेला सांगोला मतदारसंघ माढा मतदारसंघात येतो. यंदा इथून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना चार हजार 482 मतांचे मताधिक्य मिळाले. पण आमदार शहाजीबापू पाटील आणि दीपकआबा साळुंखे असे दोन नेते असताना निंबाळकर यांना म्हणावे तसे मताधिक्य मिळू शकलेले नाही. निंबाळकर यांनी या मतदारसंघात पाणीपुरवठ्याचे अनेक प्रकल्प मार्गी लावले होते. त्यानंतरही त्यांना मताधिक्य मिळाले नाही. महायुतीसाठी ही चिंतेची बाब आहे.
शहाजीबापूंसमोर दुसरे आव्हान आहे ते महायुतीचेच. यंदा हा मतदारसंघ अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मागत आहे. येथून जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी जोरदार तयारी सुरू केलीय. त्यांना अजित पवारांचा फुल सपोर्ट आहे. महायुतीत घटक पक्ष जागा मागत असल्याने शहाजीबापूंसमोर तिकीटासाठी अडचणी वाढू लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांच्यावर होत असलेली टीका, लोकसभा निवडणुकीवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी घेतलेला पंगा याही गोष्टी शहाजीबापू पाटील यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात.
दुसरीकडे शेकाप महाविकास आघाडीत आहे. शेकापकडून डॉ. अनिकेत देशमुख आणि त्यांचे बंधू बाबासाहेब देशमुख हे दोघे तयारी करत आहे. मागील निवडणुकीच्या पराभवानंतर अनिकेत देशमुख हे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी गेले होते. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क तुटला होता. तर बाबासाहेब देशमुख यांनी बाजार समिती, खरेदी विक्री संघ बिनविरोध करत ते अॅक्टिव्ह राहिले आहेत. परंतु या दोघांमध्ये उमेदवारी कुणाला? याची डोकेदुखी मात्र शेकापसमोर राहणार आहे. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते यांना दोन्ही देशमुख भावांनी मदत केली होती. पण शेकापच्या जयंत पाटील यांचा पाठिंबा बाबासाहेब यांना असू शकतो.
त्याचवेळी विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाने शेकापचे नेते जयंत पाटील यांनी मदत केली नाही. ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देत निवडूनही आणले. त्यामुळे शेकापचा करेक्ट कार्यक्रम ठाकरेंनी केलाच. पण आता हा मतदारसंघ शिवसेनेकडून मागितला जात आहे. याशिवाय ही जागा शेकापला गेल्यास शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. तर शिवसेनेला गेल्यास शेकापची मदत लागणार आहे. त्यामुळे ही जागा कोणाला जाते हा प्रश्न महाविकास आघाडीमध्ये तयार झालाय. दोन्ही आघाड्यांची तयारी पाहता येथे तिरंगी, चौरंगी लढत होऊ शकते.