Download App

आमदार बबनराव पाचपुतेंना पुतण्याचा डबल धक्का; मुलाचा पराभव

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांचे पूत्र प्रतापसिंह यांचा पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केलाय. त्यामुळे पाचपुते यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बबनराव पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीतील चाणक्य म्हणून त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते ओळखले जात होते. दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते यांचे निधन झाले होते. त्यानंतर पाचपुते कुटुंबात संघर्ष सुरू झाला. त्यामुळे ४० वर्षांत पहिल्यांदा काष्टी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत बबनराव पाचपुतेंचा पॅनल पराभूत झाला होता.

ग्रामपंचायत निवडणुकीत बबनरावांच्या पॅनलला साजन पाचपुते यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपची संपूर्ण यंत्रणा या निवडणुकीत प्रतापसिंहांच्या मदतीला धावली मात्र तरीही साजन पाचपुते यांनी वडील सदाशिव पाचपुते यांची पुण्याई व जनसंपर्काच्या बळावर त्यांना पराभूत केले.

आज झालेल्या मतमोजणीत साजन पाचपुते यांनी १६१ मतांनी सरपंचपद मिळविले. या ग्रामपंचायतील १७ जागा आहेत. त्यापैकी बबनराव पाचपुतेंच्या पॅनलने १० तर साजन पाचपुतेंच्या पॅनलने ७ जागा मिळविल्या आहेत. बबनरावांनी ग्रामपंचायतीवर सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी सरपंचपद गमावले आहे. त्यामुळे बबनराव पाचपुते यांचा १९८० पासून श्रीगोंदे तालुक्यावर असलेल्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याची चर्चा आहे.

Tags

follow us