कोल्हापूरः कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या समरजित घाटगे गटाने बाजी मारली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ गटाकडून घाटगे गटाने ग्रामपंचायती हिसकावून घेतल्या आहेत. कायम सत्ता असलेल्या मुश्रीफांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींच्या मतमोजणी सुरू आहे. त्यात कागल तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटाला मोठा धक्का बसलाय. भाजपच्या समरजित घाटगे गटाने काही ठिकाणी वर्चस्व मिळविले आहे.
बामणी, निढोरी, रणदिवेवाडीत तीन ग्रामपंचायतींमध्ये घाटगे गटाने बाजी मारली. तर बामणीत शिव-शाहू ग्रामविकास आघाडी सरपंचपदासह 8 जागांवर विजयी झाली आहे. शेतकरी विकास आघाडी 2 जागावर विजयी झाल्या आहेत. घाटगे गटाने पाच ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.
कागल तालुक्यातील प्रत्येक गावावर मुश्रीफ यांचे वर्चस्व आहे. परंतु आता त्या ठिकाणी भाजपकडून धक्के देण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये हे दिसून आले आहे. पुढील काळात इतर निवडणुका आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावल्याचे दिसून येत आहे.