Ram Shinde : राम शिंदे व रोहित पवार या दोन राजकारण्यांच्या राजकीय शेत्रात म्हणजेच कर्जतमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. कर्जत नगर पंचायतीमध्ये सुरू असलेल्या सत्तापालट बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत (Usha Raut) यांनी नुकतंच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया (DR. Pankaj Asia) यांच्याकडे सोपवला आहे. उषा राऊतांवर नव्या कायद्यानुसार, दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, त्याआधीच उषा राऊत यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आपल्याच अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे दाखल केला होता. त्यानंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप झाले. आज त्यांच्या अविश्वास ठरावावर बैठक कर्जत येथील प्रशासकीय भवनात आयोजित केली होती. तत्पूर्वी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिल्यानंतर उषा राऊत यांनी माध्यमंशी संवाद साधला असता यावेळी त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
सत्तेचा गैरवापर व आर्थिक आमिषातून नगरसेवकांना वळविण्याचे आरोप राऊत यांनी केला आहे. नुकतेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करत नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता देण्यात आली. याच नव्या अध्यादेशाचा आधार घेत नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता. रोहित पवारांच्या सत्तेला शिंदेंचा सुरुंग 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे याना पराभूत करत धक्का दिला. त्यानंतर पुन्हा एकदा 2021 मध्ये झालेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये पवार यांनी एक हाती सत्ता मिळवत राम शिंदे यांना मोठा धक्का दिला. यामुळे मतदार संघात रोहित पवार यांचे प्राबल्य दिसून आले. व आघाडीचे सरकार असल्याने मतदार संघात रोहित पवारांचा बोलबाला राहिला मात्र या पराभवाचा बदला घेण्यासाठी राम शिंदेंनी (Ram Shinde) देखील डावपेच आखले.
आमदार रोहित पवार यांच्या ताब्यात असलेल्या कर्जत नगरपंचायतीला शिंदे यांनी सुरुंग लावला आहे. रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तब्बल आठ नगरसेवक फोडले होते.
नव्या कायद्यासाठी शिंदे यांनीच पाठपुरावा केला आहे. त्यानुसार कर्जतच्या नगराध्यक्ष राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी 11 नगरसेवकांसह भाजपाच्या 2 अशा 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे अस यावेळी माजी नगरध्यक्षा उषा राऊत यांनी केला.