Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (MahaYuti) आता उमेदवारांची घोषणा होताना दिसत आहे. राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात थेट लढत काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आहे तर काही ठिकाणी लढत तिरंगी होणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) देखील आता तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात वंचितने आपला उमेदवार दिल्याने या मतदारसंघात कोणाचा विजय होणार? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीकडून या राम सातपुते (Ram Satpute) मैदानात आहेत. यातच वंचितने आपला उमेदवार दिल्याने ही लढत तिरंगी झाली आहे.
तर आता पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात एक नवीन ट्विस्ट आला आहे. माहितीनुसार, सोलापूर लोकसभा मतदारसंघात आता एमआयएम देखील आपला उमेदवार देणार आहे. सुरुवातीपासूनच या मतदारसंघात एमआयएमची (AIMIM) भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. तर आता एमआयएम सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी ( Farooq Shabdi) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे.
माध्यमांशी बोलताना शाब्दी म्हणाले, आम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या कोणत्या पार्टीचा किंवा उमेदवाराचा विचार करणार नाही, आम्ही या मतदारसंघात तगडा उमेदवार देणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने राखीव प्रवर्गातील अनेक इच्छुक उमेदवारांनी एमआयएमकडे तिकीटाची मागणी केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात असा उमेदवार देणार आहे, जो सर्वच विरोधकांना घाम फोडणार आहे. असं देखील यावेळी फारूक शाब्दी म्हणाले.
विरोधकांना घाम फोडणार
माध्यमांशी बोलताना शाब्दी म्हणाले, खालच्या पातळीवर जाऊन प्रणिती शिंदे आणि राम सातपुते प्रचार करताना एकमेकांवर टीका करत आहेत. मात्र दोघांच्या या टीका टिप्पणीत मला पडायचे नाही. प्रणिती शिंदे असो किंवा राम सातपुते आम्ही या लोकसभा निवडणुकीत कोणाचा विचार करणार नाही. महाविकास आघाडी आम्हाला त्यांच्यासोबत घेत नाही आणि लढूही देत नाही. यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार देणार आहोत.
माहितीनुसार, एमआयएमकडे सोलापूर मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी चार जणांनी तिकीटाची मागणी केली आहे. यात मोहोळ येथील माजी आमदार रमेश कदम यांचा देखील समावेश आहे. जर एमआयएम सोलापूर मतदारसंघात मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना उमेदवारी दिली तर याचा फटका इतर उमेदवारांना नक्कीच बसणार आहे.
MVA ची अडचण वाढणार, भिवंडीमध्ये शरद पवारांना आव्हान देणार काँग्रेसचा इच्छुक उमेदवार?
एमआयएमच्या वरीष्ठ नेत्यांची मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता अशी संकल्पना राबवणारे रमेश कदम यांच्यासोबत बोलणी सुरू असल्याची माहिती फारूक शाब्दी यांनी दिली आणि आमचा उमेदवार सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वांना घाम फोडणार असेल असा विश्वासही व्यक्त केला.