Download App

Loksabha Election 2024 : साताऱ्याच्या जागेवर नेमकं कोण लढणार? पृथ्वीराजबाबांनी केली भूमिका जाहीर

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपावरुन काही मतदारसंघ चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यात सातारा लोकसभा (Satara Loksabha)मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं (NCP Sharad Pawar Group)आलेला आहे. असं असलं तरी अद्यापही या ठिकाणी उमेदवार जाहीर झालेला नाही. या मतदारसंघासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. शरद पवार या मतदारसंघात जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्याच्या पाठिमागे आम्ही ताकदीने उभे राहणार असल्याचेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

Hingoli Loksabha : अखेर शिंदेंच्या शिवसेनेची माघार, उमेदवार बदलण्याची शक्यता?

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, सातारा लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. त्यामुळे शरद पवार जो उमेदवार देतील, त्याच्या पाठिमागे आम्ही उभे राहणार आहोत. सातारा ही माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे. फुले-शाहु-आंबेडकरांचा विचार या ठिकाणाहून निर्माण झाला. या भूमीमध्ये जातीवादी विचारांचं बीज रोवलं जाऊ नये.

Nilesh Lanke : लोकसभेसाठी लंकेंची जनसंवाद यात्रा! जयंत पाटलांसह राऊतांच्या उपस्थितीत शुभारंभ

आत्तापर्यंत या ठिकाणी भाजपचा किंवा जातीयवादी विचारांचा विजय झाला नाही. आत्तासुद्धा या ठिकाणी होऊ नये अशी आमची भूमिका आहे. पण शेवटी निर्णय हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे.

शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय, असं विचारताच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नुकतीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्यावेळी आमची सबंध राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

अर्थात त्यावेळी साताऱ्याची देखील चर्चा झाली. त्यांनाही मी हेच सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ आपण राखला पाहिजे. महाविकास आघाडी त्या ठिकाणी विजयी झाली पाहिजे. उमेदवार कोण द्यायचा? हे पवारसाहेब ठरवतील. नावाच्या चर्चा हे ते चालूच असतात.

त्याचवेळी जर पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी करण्याची वेळ आली तर आपली काय भूमिका असणार? असे विचारण्यात आले, त्यावर त्यांनी सांगितले की, मी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ही अडचण आहे.कारण ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. त्यांनी त्याबद्दलचा निर्णय करायचा आहे, असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.

विविध राजकीय पक्षांकडून आपापले उमेदवार जाहीर केले जात आहेत. त्यावरुन आता राज्यात लोकसभेची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही मतदारसंघामध्ये चांगलीच अटीतटीची लढत होणार आहे. राज्यातील काही मतदारसंघ चांगलेच चर्चेत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ. साताऱ्याचा गड आता कोण राखणार हे देखील पाहावं लागणार आहे.

follow us