Download App

जानकरांकडून `कात्रजचा घाट`; पवारांच्याही डोक्यात चक्रे फिरू लागलीत..

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Vs Mahadeo Jankar महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा (Sharad Pawar) डाव हा अखेरचा डाव असतो, असे समजले जाते. काही पत्ते हातात ठेवूनच ते खेळ्या करत असतात असाही त्यांच्याबद्दचा समज आहे. मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांच्याकडून त्यांचा कात्रजचा घाट झाल्याचे दिसून येत आहे. आता हा कात्रजचा घाट म्हणजे जायचे एकीकडे पण आपण दुसरीकडे जाणार, असे भासवायचे. म्हणजे जानकर यांना महायुतीतच जायचे होते पण त्यांनी शरद पवार यांच्याशी बोलण्याचा देखावा केला. माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीची पवारांची ऑफर आपण स्वीकारल्याचे ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांत सांगत होते. माझी बहीण पंकजा मुंडे हिने जरी सांगितले तरी आता मी ऐकणार नाही. मी राष्ट्रवादीकडूनच लढणार. आपण दोघेही खासदार होऊ आणि दिल्लीत जाऊ, असे मी तिला सांगणार, अशी वक्तव्ये जानकर हे पत्रकारांशी बोलताना करत होते. पण हे सारे ऑफ द रेकाॅर्ड. प्रत्यक्षात त्यांच्या मनात वेगळेच होते, हे नंतर सिद्ध झाले.

जानकर हे महाविकास आघाडीत जाण्याचा धोका लक्षात यायला भाजपला वेळ लागला नाही. धनगर समाजाची व्होट बॅंक ही जानकर यांच्या पाठीशी आहे. जानकर सांगतील तिकडे त्यांचे पाठीराखे मतदान करतात. हा आपल्या समाजाचा विश्वास जानकर यांनी कमावला आहे. म्हणूनच अनेक पक्षांच्या स्पर्धेत ते आपली जागा टिकवून आहेत. पवारांशी जानकर हे सातत्याने संपर्कात होते. पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडायच्या आधीच भाजपने जानकरांना गळाला  लावले.

महायुतीच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी होळीचा दिवस निवडला. जानकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी होळीच्या दिवशी मुंबईला बोलावून घेतले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर चौघे नेते बसले. जानकर यांच्या मनातील सारी खदखद या तिघांनी ऐकली. त्यावर योग्य उपाययोजना केली. लोकसभेची एक जागा देण्याचे महायुतीने मान्य केले. जानकर यांचे सारे राजकारण हे पवारविरोधावर उभे राहिले आहे. तेच जर पवारांसोबत गेले तर त्यांच्या पक्षाला ओहोटी लागेल, असे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. जानकरांनाही मनापासून पवारांसोबत थोडेच जायचे होते? आपली बार्गेनिंग पाॅवर वाढविण्यासाठीच ते पवारांच्या संपर्कात होते. त्यांच योग्य दखल महायुतीने घेतल्यानंतर जानकर यांच्याही मनासारखे घडले.  समजा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर आपली विधान परिषदेवरील नियुक्ती पुढेही कायम ठेवण्याचा शब्द त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडून घेतला.

पण जानकर हे कधीही शब्द फिरवू शकतात, याचे भान महायुतीच्या नेत्यांना असल्याने त्यांनी लगेच एक प्रसिद्धीपत्रक तयार केले. त्याच्यावर शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि जानकर यांनी सह्या केल्या. जानकर हे महायुतीसोबतच राहणार असल्याचे त्यांच्याकडून लिहून घेतले. शिंदे आणि फडणवीस यांना जानकर यांनी मिठी मारल्याचे फोटो अधिकृतरित्या देण्यात आले. अजित पवार यांना जानकर यांनी मिठी मारली की नाही, मारली असेल तर त्याचा फोटो रिलीज का झाला नाही, हा प्रश्न उरतोच.

तर या जानकर यांच्या या यू टर्नमळे शरद पवार यांची मात्र काही समीकरणे नक्कीच बिघडली. जानकर यांचा उपयोग बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांना झाला असता. माढ्यात जानकर यांच्या रूपाने महाविकास आघाडीला तुल्यबळ उमेदवार मिळाला असता. या राजकीय धक्क्यानंतर पवार आता माढ्यात पुन्हा कामाला लागले आहेत. यासाठी त्यांना आधार आहे तो आता मोहिते पाटील घराण्याचा.

भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना माढ्यातून पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नुसते नाराज नाहीत तर चिडलेले आहेत. मोहिते पाटील यांच्या मदतीने निंबाळकर यांनी २०१९ ची लोकसभेची निवडणूक जिंकली. पण मोहिते पाटलांना नंतर त्यांनी म्हणावा तसा मानसन्मान दिला नाही. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या बंगल्याची पायरीदेखील खासदार झाल्यानंतर निंबाळकर चढले नाहीत. साहजिकच तालेवार समजल्या जाणाऱ्या मोहिते घराण्याचा हा अपमानच होता. दुसरीकडे या अपमानाच्या आगीत फलटणच्या रामराजे निंबाळकर यांच्याकडूनही इंधन पुरवले गेले. त्यामुळे मोहिते पाटलांचा भडका शांत झालेला नाही.

मोहिते पाटील आणि शरद पवार यांच संबंध २०१९ पासून दुरावले आहेत. खरे तर ते २००३-२००४ मध्येच त्यांच्यात संघर्ष उडाला होता. विजयसिंह मोहिते पाटलांनी तेव्हाच राष्ट्रवादी काॅंग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला होता, असा त्यांच्यावर तेव्हा संशय घेतला गेला. त्या वेळी त्यांना उपमुख्यमंत्री करून हा संघर्ष टाळण्यात आला. पण मोहिते पाटील हे पवारांच्या मनातून उतरले होते. २०१९ मध्ये तर मोहिते पाटलांनी पवारांची साथ सोडत भाजपप्रवेश केला. त्यामुळे होता तो राजकीय संबंधही संपला.

आता मात्र पुन्हा सूर जुळू लागले आहेत. मोहिते पाटलांना खासदार निंबाळकर यांना धडा शिकवायचा आहे तर पवारांना योग्य उमेदवार हवा आहे. त्यातूनच मग धैर्य़शील मोहिते पाटील यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भाने रणजितसिंह मोहिते पाटील आणि पवार यांची भेटही झाली आहे. गेल्या पाच वर्षांत मोहिते पाटील हे भाजपच अनेक अर्थान लाभार्थी राहिले आहेत. त्यांच्या कारखान्याला मोठी मदत करण्यात आली. रणजितसिंह यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नेमण्यात आले. मोहिते पाटील हे पुन्हा पवारांसोबत गेले तर त्याची मोठी राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागण्याचा धोका आहे. पण आपले अस्तित्व ठेवायचे असेल तर हा धोका पत्करल्याशिवाय पर्याय नाही, अशीही या कुटुंबाची मानसिकता झाली आहे. त्यामुळे पवारांच्या डोक्यात मोहिते पाटलांचे नावाचे चक्र वेगाने फिरत आहे.

 

follow us