फडणवीसांची जानकरांसोबत एकच बैठक अन् पवारांच्या तीन प्लॅनला सुरुंग लागला…
मुंबई : महादेव जानकर कोणासोबत लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार? पुढचं राजकारण कोणसोबत करणार? महाविकास आघाडी की महायुती? या बहुचर्चित प्रश्नांची उत्तर अखेरीस मिळाली आहेत. जानकर हे मागील काही दिवसांपासून भाजप त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत जाण्याचे जवळपास निश्चित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कोट्यातून त्यांना माढ्याची जागा सोडणार असल्याचे सांगितले गेले होते. पण शनिवारी दुपारी चक्र फिरली आणि एकाच बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकरांचे (Mahadev Jankar) सगळे रुसवे, फुगवे दुर केले… जोडीला शरद पवार यांच्या तीन प्लॅनला सुरुंगही लावला… (DCM Devendra Fadnavis removed Mahadev Jankar’s displeasure in a single meeting)
नेमके काय घडले शनिवारी? आणि फडणवीसांनी कोणत्या तीन प्लॅनला सुरुंग लावला? पाहुया..
शनिवारी दुपारी फडणवीस यांनी महादेव जानकरांना बोलावून घेतले. जोडीला एकनाथ शिंदे आणि अजित पवारही होतेच. आपल्या पक्षाकडे दुर्लक्ष केल्याने, एनडीएच्या बैठकीलाही न बोलावल्याने जानकर हे मागील काही दिवसांपासून भाजपवर नाराजच होते. त्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत जाणार अशी चर्चा होती. अशात लोकसभा निवडणुकीमध्ये जानकरांनी भाजपकडे तीन जागांची मागणी केली. यात माढा आणि परभणी या दोन जागांचा समावेश होता. पण भाजपने माढ्याचा उमेदवार जानकरांचा विचारही न करता जाहीर केला. त्यामुळे ते अधिकच दुखावले गेले. मोठे प्लेअर आले की छोट्या प्लेअरला विसरतात, अशी टीका त्यांनी करायला सुरुवात केली.
पाच वर्षांचे प्रश्न, अडचणी अन् दुःखावर फडणवीसांची फुंकर… राम शिंदे अन् विखे पाटलांची अखेर ‘दिलजमाई’
दुसऱ्या बाजूला जानकरांनी पवारांसोबतही बोलणी सुरु ठेवली. “शरद पवार मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यांनी मला प्रतिसाद दिला. मी हळव्या मानाचा माणूस आहे, आमच्यात चांगली चर्चा झाली” असे ते सांगू लागले. शुक्रवारी जानकर यांनी शरद पवार यांनी आपल्या पक्षाला माढ्याची जागा सोडल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अद्याप जागा वाटप झाले नसले तरी माढ्याची जागा आम्हाला दिली आहे. मी माढ्यातून किमान अडीच लाख मतांच्या फरकाने निवडून येणार, असा दावा करु लागले. त्यामुळे आता केवळ अधिकृत घोषणाच बाकी आहे, असे दिसून येऊ लागले.
पण शनिवारी दुपारी फडणवीस यांनी जानकर यांच्यासोबत बैठक लावली. जानकरांसारखा बडा धनगर चेहरा भाजपपासून दुरावला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, ते दुरावले तर माढा, बारामती या मतदारसंघासोबतच राज्यातील धनगर मतांवरही फटका या गोष्टी लक्षात येताच त्यांनी जानकरांसोबत चर्चा करायची ठरवले. जवळपास तास-दीड तास चाललेल्या बैठकीत जानकर यांचे मत ऐकून घेतले. त्यांच्या नाराजीची कारणे ऐकून घेतली.
‘आता योग्य वेळ आलीये..’; 4 राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या बॉलिवूडची ‘क्वीन’ची राजकारणात एन्ट्री
अखेरीस राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले. जानकरांची नाराजी दूर झाली. त्यांनी महायुतीतच थांबण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर फडणवीस यांना मिठी मारतानाचा जानकरांचा प्रेमळ फोटोही व्हायरल करण्यात आला. हा फोटो पाहून कोणीही म्हणणार नाही की हेच जानकर कालपर्यंत भाजपला शिव्या घालत होते, फडणवीस यांच्यावर टीका करत होते. पण फडणवीसांनी एकाच बैठकीत ही किमया साधली. आता जानकरांना सोबत घेऊन फडणवीस यांनी पवारांचे तीन प्लॅन उधळून लावले असल्याचे बोलले जात आहे.
माढ्यात प्रभावी उमेदवार :
जानकर सोबत आले असते तर महाविकास आघाडीला माढ्यामध्ये प्रभावी उमेदवार मिळाला असता. कारण माढ्यात पवारांकडे सक्षम उमेदवार नव्हता. तिथे विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवार यांची साथ सोडल्यानंतरच या मतदारसंघावरुन राष्ट्रवादीचा होल्ड गेला. अजित पवारही राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे हे उघडपणे रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देत आहेत. 2019 मध्ये ज्या संजय शिंदे यांनी निंबाळकरांविरोधात निवडणूक लढविली होती त्यांनीही निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची घोषणा केली आहे. फलटणचे रामराजे निंबाळकर अजितदादांसोबत आहेत. माण खटावचे जयकुमार गोरे आधी काँग्रेससोबत होते आता ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे माढ्यात शरद पवार यांच्याकडे एकही सक्षम चेहरा नाही. त्यामुळे जानकर सोबत आले असते तर माढ्यात पवारांना निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार मिळाला असता.
सुप्रिया सुळे सेफ झाल्या असत्या…
बारामती मतदारसंघातील दौंड, बारामती, इंदापूर आणि भोरच्या काही भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर मतांचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी शक्यता पवारांना वाटत होती. माढ्याची जागा जानकरांना देऊन त्यांची बारामती मतदारसंघासाठी त्यांची मदत घ्यायची, लेकीला सेफ करायचे असा मानस पवारांचा होता. जानकर यांचाही बारामती मतदारसंघात मोठा संपर्क आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील धनगर मतदार हे सुप्रिया सुळे यांना साथ देतील, अशी आशा त्यांना होती. पण जानकर आता महायुतीसोबतच राहणार असल्याने पवारांना बारामतीमधील धनगर मते आपल्याकडे वळविताना मोठा संघर्ष करावा लागू शकतो.
इतर मतदारसंघातील धनगर मते महाविकास आघाडीला मिळाली असती :
राज्यातील 30 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक मते आहेत. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धुळे, सांगली, अकोला, परभणी, लातूर, सातारा, कोल्हापूर, धाराशिव जिल्ह्यात बऱ्यापैकी धनगर समाजाची लोकसंख्या आहे. 2014 च्या निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता विराजमान करण्यात या धनगर समाजाचा मोठा वाटा होता. महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत गेले असते तर राज्यातील मोठ्या प्रमाणातील धनगर मते महाविकास आघाडीच्याच बाजून गेली असती. त्यामुळेच फडणवीस यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेऊन जानकर यांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.