फडणवीसांनी एका दिवसात सेट केलं पाच जागांवरचं राजकारण… CM शिंदे अन् अजितदादाही खूश

फडणवीसांनी एका दिवसात सेट केलं पाच जागांवरचं राजकारण… CM शिंदे अन् अजितदादाही खूश

शनिवारचा दिवस… महाराष्ट्रभरातील दौरे, दिल्लीतील पक्षाची निवडणूक समितीची बैठक असा प्रवास संपवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांच्या सागर बंगल्यावरच होते. हा संपूर्ण दिवस त्यांनी राखून ठेवला होता नाराजींची मनधरणी करण्यासाठी. कालच्या एका दिवसात विविध नेते, आमदार, खासदार यांच्या भेटीगाठी घेत आणि नाराजांची मनधरणी करत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील किमान पाच लोकसभा मतदारसंघातील तरी राजकारण सेट केले असावे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Devendra Fadnavis met Jyoti Mete, Harsh Vardhan Patil, Ram Shinde, Ranjit Singh Mohite Patil)

पाहुया फडणवीसांनी एका दिवसात नेमके काय काय केले…

ज्योती मेटे पुन्हा भाजपसोबत :

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी सागर बंगल्यावर ज्योती मेटे आमंत्रित केले होते. दिवंगत विनायक मेटे हे भाजपसोबत होते. त्यांच्या निधानंतर शिवसंग्राम संघटनेची सुत्रे ज्योती मेटे यांच्या हाती आली. पण भाजपकडून संघटनेकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हणत त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका स्वीकारली होती. अशात काही दिवसांपासून शिवसंग्राम संघटनेची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाशी सलगी वाढताना दिसत होती. त्याचवेळी पवारांकडून मेटे यांना बीड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार या चर्चांनी जोर धरला. नुकतीच त्यांनी पुण्यात पवारांची भेटही घेतली. त्यामुळे या चर्चांना हवा मिळाली.

फडणवीसांची जानकरांसोबत एकच बैठक अन् पवारांच्या तीन प्लॅनला सुरुंग लागला…

मराठवाड्यात सध्या मराठा आरक्षणा आंदोलनाच्या निमित्ताने वातावरण तापले आहे. त्यामुळे ज्योती मेटेंसारख्या मराठा चेहऱ्याला उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्याची पवार यांची खेळी असल्याचे बोलले जाऊ लागले. पण फडणवीसांनी मेटेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत त्यांना न्याय वागणूक देण्याची भूमिका भाजपची असल्याचे आश्वस्त केले. त्यामुळे मेटे यांनी भाजपसोबतच राहण्याची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

रणजीतसिंह मोहिते पाटील संभाव्य बंड शमवले :

फडणवीसांनी माढा लोकसभेचाही कालच प्रश्न निकाली काढला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचा त्यांना विरोध होता. धैर्यशिल मोहिते पाटील यांनी थेट तुतारीच चिन्ह हाती घ्यावे अशी मागणी कार्यकर्ते करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. भाजपकडून जरी उभे राहिला तरी तुम्हाला मतदान करणार नाही, असे कार्यकर्ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसून येत होते. रामराजे नाईक निंबाळकर यांनीही नुकताच फलटणमध्ये भव्य मेळावा घेतला. यात आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांना चेतवण्याचे काम केले.

याच सगळ्या घटनाक्रमानंतर भाजप माढ्यातून उमेदवार बदलणार अशा चर्चांना सुरुवात झाली. पण शनिवारी सागर बंगल्यावर फडणवीस यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना बोलावून घेतले. या भेटीनंतर मोहिते-पाटलांचे भाजप विरोधातील संभाव्य बंड शमल्याचे संकेत मिळाले आहेत. स्वतः धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही मतदारसंघात करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस, फलटण, माण-खटाव परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू केलेला गावभेट दौरा थांबविला आहे. फडणवीस यांच्याकडून मोहिते पाटील यांना आगामी मंत्रिमंडळात समावेशाचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले जात आहे.

महादेव जानकरांना महायुतीत ठेवण्यास फडणवीसांना यश :

आपल्या पक्षाकडे दुर्लक्ष केल्याने, एनडीएच्या बैठकीलाही न बोलावल्याने रासपचे प्रमुख महादेव जानकर मागील काही दिवसांपासून भाजपवर नाराजच होते. ते महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशात लोकसभा निवडणुकीत जानकरांनी भाजपकडे तीन जागांची मागणी केली. यात माढा आणि परभणी या जागांचा समावेश होता. पण भाजपने जानकरांचा विचारही न करता माढ्याचा उमेदवार जाहीर केला. त्यामुळे ते अधिकच दुखावले गेले. मोठे प्लेअर आले की छोट्या प्लेअरला विसरतात, अशी टीका त्यांनी करायला सुरुवात केली.

Ahmednagar : शिर्डी लोकसभा! ‘महायुती धर्म पाळा’… आठवलेंच्या उमेदवारीसाठी आरपीआय आक्रमक

दुसऱ्या बाजूला जानकरांनी पवारांसोबतही बोलणी सुरु ठेवली. “शरद पवार मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यांनी मला प्रतिसाद दिला. मी हळव्या मानाचा माणूस आहे, आमच्यात चांगली चर्चा झाली” असे ते सांगू लागले. शुक्रवारी जानकर यांनी शरद पवारांनी आपल्या पक्षाला माढ्याची जागा सोडल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अजून जागा वाटप झाले नसले तरी माढ्याची जागा आम्हाला दिली आहे. मी माढ्यातून किमान अडीच लाख मतांच्या फरकाने निवडून येणार, असा दावा करु लागले. त्यामुळे आता केवळ अधिकृत घोषणाच बाकी आहे, असे दिसून येऊ लागले.

पण शनिवारी दुपारी फडणवीस यांनी जानकर यांच्यासोबत बैठक लावली. जानकरांसारखा बडा धनगर चेहरा भाजपपासून दुरावला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, ते दुरावले तर माढा, बारामती या मतदारसंघांसोबत राज्यातील धनगर मतांवरही फटका बसू शकतो या गोष्टी लक्षात येताच त्यांनी जानकरांसोबत चर्चा करायची ठरवले. जवळपास तास-दीड तास चाललेल्या बैठकीत जानकर यांचे मत ऐकून घेतले. त्यांच्या नाराजीची कारणे ऐकून घेतली. अखेरीस राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले. जानकरांची नाराजी दूर झाली. बैठकीनंतर फडणवीस यांना मिठी मारतानाचा जानकरांचा प्रेमळ फोटोही व्हायरल करण्यात आला. हा फोटो पाहून कोणीही म्हणणार नाही की हेच जानकर कालपर्यंत भाजपला शिव्या घालत होते, फडणवीस यांच्यावर टीका करत होते. पण फडणवीसांनी एकाच बैठकीत ही किमया साधली.

बारामतीचा वाद मिटवून अजितदादांनाही खूश केले :

आधी विधानसभेचा शब्द द्या, मगच लोकसभेचे काम करणार अशी भूमिका घेत बारामती मतदासंघासाठी इंदापूरमधून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांचे काम करण्यास नकार दिला होता. दत्तात्रय भरणे यांच्यारुपाने इंदापूर हा अजित पवार यांचा हक्काचा बालेकिल्ला तयार झाला आहे. भरणेंनी इथून दोनवेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजय मिळविला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पाटील यांच्यासाठी कसा सोडायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यासाठी पाटील यांच्यासोबत चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी स्वतः बैठक घेतली होती. मात्र तोडगा निघू शकला नव्हता.

“इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी स्वागत करते” : प्रणितींनी सेट केला प्रचाराचा अजेंडा

त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढणे हे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मोठे आव्हान बनले होते. अखेर शनिवारी सागर बंगल्यावर फडणवीस यांनी दटावण्याच्या स्वरात येऊनच “विधानसभेसंदर्भात वेळ आल्यावर निर्णय घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा,” असे पाटील यांना निर्देश दिले आहेत. बारामतीतील महायुतीचा जो उमेदवार असेल त्यासाठी काम करा. महायुतीच्या उमेदवारा विरोधात कोणताही प्रचार करू नका. समर्थकांनाही तशी समज द्या, असे निर्देश त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिले आहेत.

राम शिंदे अन् विखे पाटील वादात मध्यस्थी :

अहमदनगरमध्ये भाजप आमदार राम शिंदे यांचा राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील या पित्रा-पुत्राच्या जोडीला कमालीचा विरोध होता. विखे पाटील यांनी पाच वर्षात आपल्याच सोयीने काम केले, अशी भूमिका घेत शिंदे यांनी विखे पाटील यांना विरोध करायला सुरुवात केली होती. इतकेच नाही तर लोकसभेसाठी स्वतःची दावेदारीही सांगितली होती. त्यानंतर सुजय विखे पाटील यांना तिकीट जाहीर झाले. मात्र तरीही शिंदेंनी तलवार म्यान केली नव्हती. अखेरीस शनिवारी सागर बंगल्यावर रात्री उशीरा फडणवीस यांची राम शिंदे आणि विखे पिता-पुत्रांसोबत बैठक पार पडली. यानंतर राम शिंदे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना परस्परांमधील वाद संपुष्टात आले आहेत, या निवडणुकीत अहमदनगरमध्ये भाजपचा खासदार झाला पाहिजे, त्या अनुषंगाने आजची बैठक यशस्वी झाली आहे, अशी भूमिका मांडली.

मुख्यमंत्री शिंदे यांचेही टेन्शन हलके केले :

आपल्या पक्षातील वाद मिटवितानाच फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही टेन्शन हलके करण्याचे काम केले. शनिवारी दुपारी उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रामटेक लोकसभा मतदारसंघाची जागा सध्या शिवसेनेकडे आहे. पारवे इथून लोकसभेसाठी इच्छुक होते. तसेच कृपाल तुमाने यांचे तिकीटही कापले जाणार असल्याचे सांगितले जात होते. अशात पारवे यांनी भाजप प्रवेशाची तयारी सुरु केली. मात्र शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपला सोडायला नकार दिला. त्यानंतर पारवे यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर देण्यात आली. पण ते या प्रवेशासाठी फारसे उत्सुक नव्हते. अखेर फडणवीस यांनीच मध्यस्थी करत पारवेंची समजूत काढली. त्यानंतर दिवस मावळताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अशा रितीने फडणवीस यांनी शिंदेंचेही टेन्शन हलके करण्याचे काम केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube