Eknath Shinde On Rahul Gandhi : विधानसभा निवडणुकीत राज्यात लाट नाही तर लाडक्या बहिणींची महालाट धडकली. लाडक्या बहिणी, लाडके भावांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्यांनी विरोधी पक्षातील सावत्र भावांना चांगलाच जोडा दाखवला आणि महायुतीला (Mahayuti) ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या निकालाने राहुल गांधींना (Rahul Gandhi) 440 व्होल्ट्सचा झटका लागला असून पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला.
मुक्तागिरी येथे आज वाशिम, करंजा, छत्रपती संभाजी नगर, अकोला, भिवंडी, कल्याण यासह ग्रामीण भागातील हजारो उबाठा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपमुख्यंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार भावना गवळी यांच्या पुढाकाराने उबाठा गटाचे अकोला जिल्हा प्रमुख विजय मालोकार, प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भोजराज, काँग्रेस वाशिम जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, प्रमोद राऊत, काँग्रेस कारंजा तालुका उपाध्यक्ष विजय खैरे, भाऊ थोरात, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल गवई यांच्यासह 75 कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर मालोगाव तालुका, छत्रपती संभाजी नगर, अकोला, भिवंडी, कल्याण यासह ग्रामीण भागातील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तसेच केरळ राज्य प्रमुख एन. भुवनचंद्रन यांनीही आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राहुल गांधींना दिल्लीत पराभव दिसू लागल्याने ते महाराष्ट्रातील निकालावर आरोप करत आहेत. राहुल गांधी यांनी पराभव मान्य करायला हवा. महाराष्ट्रातील मतदारांनी विरोधकांचा सुपडा साफ केला आणि महायुतीला प्रचंड विजय मिळवून दिला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करतोय. लोकांना काम करणारे लोक हवेत, दररोज आरोप आणि शिव्याशाप देणारे लोक नकोत हे विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले. निवडणूक हरल्यावर ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि न्यायालयाला काही लोक दोष देतात.
जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि खरी शिवसेना कोण याचा कौल घेऊ असे म्हणणाऱ्यांना मतदारांनी निवडणुकीत सडेतोड उत्तर दिले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. ऑपरेशन टायगर विषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री असल्याने सर्वच पक्षाचे आमदार संपर्कात असतात.
‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ
लोकांना कामे हवीत आहेत. जे कामासाठी येतात त्यांचा पक्ष वैगरे बघत नाही काम करतो. शिवसेना हा वाघाचा पक्ष आहे. वाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही त्याला वाघाचे काळीज लागते, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.