Jayant Patil replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र (Amit Shah) दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Election) अमित शाह यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमित शाह यांची जळगावात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. महाराष्ट्राची जनता शरद पवारांना मागील 50 वर्षांपासून सहन करत आहे, अशी टीका शहा यांनी कली होती. त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राने शरद पवारांना कायमच साथ दिली. त्यांना सहन करण्याचा प्रश्नच येत नाही, असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील शेवटचा डाव आखणार.. दिल्लीसुद्धा पवारांना घाबरते म्हणणाऱ्यांना विखेंचा मार्मिक टोला
पाटील पुढे म्हणाले, 50 वर्षे महाराष्ट्राला शरद पवार यांचे एक स्वप्न, एक तरुण शून्यातून जग निर्माण करणारा ते इथपर्यंतचा त्यांचा प्रवास महाराष्ट्राने पाहिला आहे. महाराष्ट्राने त्यांना कायमच साथ दिली. सहन करण्याचा कधीच प्रश्न उद्भवला नाही. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन राजकारण केलं म्हणून आज त्यांना शरद पवार म्हणतात. देशाचे कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी केलेले काम, महाराष्ट्राचे मु्ख्यमंत्री असतानाचे त्यांचे काम, किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतर शरद पवार यांनी जे काम केलं ते महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. महाराष्ट्रात सर्वात मोठी ताकद शरद पवारांची आहे, प्रतिमा मोठी आहे, महाराष्ट्र त्यांनाच मानतो त्यामुळे अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते अमित शाह?
इंडिया आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहेत. घराणेशाही मानणारे पक्ष लोकशाहीला पूरक नाहीत. इंडिया आघाडी फक्त मुलामुलींना सत्तेत बसवण्यासाठीच एकत्र आली असून सोनिया गांधींना राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायंच आहे, तर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं असून ममता बॅनर्जी यांना पुतण्याला तर स्टॅलिन यांना मुलाला मुख्यमंत्री बनवायंच आहे. शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून सहन करतेय. विरोधी पक्ष लोकशाही नव्हे तर घराणेशाही जपण्यात मस्त आहेत, असे गृहमंत्री अमित शाह जळगाव येथील सभेत म्हणाले होते.
‘आदित्य ठाकरेंनी दिल्लीत अमित शाहांची घेतली भेट’; शिंदे गटाच्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ!