‘आदित्य ठाकरेंनी दिल्लीत अमित शाहांची घेतली भेट’; शिंदे गटाच्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ!
Deepak Kesarkar on Aditya Thackeray : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी (Deepak Kesarkar) आदित्य ठाकरेंबाबत मोठा दावा (Aditya Thackeray) केला आहे. निवडणुका जवळ आल्याने त्यांनी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची (Amit Shah) भेट घेतली असा दावा केसरकर यांनी केला आहे. मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. त्यांनी आम्हाला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तसे वागलो नाही, असेही केसरकर म्हणाले.
पहिली ते दहावी मराठी अनिवार्य : राज ठाकरेंची मागणी अन् केसरकरांनी क्षणात घोषणाही केली
केसरकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी किमान युतीचा धर्म पाळायला हवा होता. आम्ही युतीधर्म पाळला त्यामुळे आता त्यांनी आमच्यावर कितीही टीका केली तरी आम्हाला त्याचे काही वाटत नाही. ठाकरे गटाने आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु, आम्ही त्यांची बदनामी केली का, असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला. खरे बदनाम तर तेच आहेत. मात्र, काहीही कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.
आदित्य ठाकरेंबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. त्यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीची माहिती सगळ्यांनाच होती. त्यांनी ही भेट का घेतली, कशासाठी घेतली याची माहिती जनतेला आहे, असा टोला केसरकर यांनी लगावला. आपल्यावर एखादी केस दाखल झाली की राजकीय हल्ला झाला असं म्हणायचं. असे बोलण्यापेक्षा आधीच काही पथ्य पाळली असती तर बरं झालं असतं. आमच्यात एकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे हेच आमचे ध्येय आहे, असेही केसरकर म्हणाले.