Download App

ठाकरेंना धक्क्यांवर धक्के! दिल्लीतील संमेलनात खासदाराची हजेरी; साळवीनंतर शिंदेंचं दुसरं ऑपरेशन

दिल्लीतील साहित्य संमेलनातील आणखी एक  मोठी बातमी फुटली आहे. या संमेलनात ठाकरे गटाचा एक खासदार उपस्थित होता.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात चार ते पाच दिवसांपासून राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. या घडामोडींचा केंद्रबिंदू शिवसेनेतील दोन्ही गट ठरले आहेत. दिल्लीतील साहित्य संमेलनात शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार. ठाकरेंचे एकनिष्ठ राजन साळवी यांचा शिंदेसेनेत प्रवेश. माजी आमदार सुभाष बने यांचाही जय महाराष्ट्र. शिंदेंचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या तीन खासदारांची हजेरी.. या घटनांची राज्याच्या राजकारणात तुफान चर्चा होत असतानाच दिल्लीतील साहित्य संमेलनातील आणखी एक मोठी बातमी फुटली आहे. या संमेलनात ठाकरे गटाचा एक खासदार उपस्थित होता अशी चर्चा रंगली आहे. संजय दिना पाटील हेच ते खासदार असल्याचे समोर आल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

“संजय राऊत जे बोलले ते बरोबरच, पवारांनी विश्वासघात केला” विनायक राऊतही संतापले 

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजकीय वादाचं ठरलं. या संमेलनात शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. हा सत्कार ठाकरे गटाच्या जिव्हारी लागली.  खासदार संजय राऊत, विनायक राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट शरद पवारांनाच फैलावर घेतलं. त्यांच्यावर जोरदार टीका केली. पण, या दरम्यानच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे या नेत्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

खरंतर याच संमेलनात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. व्यासपीठावर न जाता ते खाली उपस्थितांत बसले होते. या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे एक ट्विटही त्यांनी केले. या ट्विटमध्ये शरद पवार यांचाही उल्लेख त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मात्र टाळला. महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार व मराठी जन सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित होतो. यावेळी पद्ममविभूषण, राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असे खासदार पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अखेर राजन साळवींचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र! उपनेते पदाचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेश करणार

साळवींनंतर कोकणात दुसरं ऑपरेशन

कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. यानंतर संगमेश्वर चिपळूण मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने देखील 15 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. यावेळी त्यांचा मुलगा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

साळवींचा मुलगा, भाऊ, पुतण्याही शिंदेसेनेत

रत्नागिरीतही या घडामोडींचे पडसाद उमटत आहेत. राजन साळवी यांच्या पाठोपाठ अन्य पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. राजन साळवी यांचा छोटा मुलगा अथर्वने युवा निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेशने देखील युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी यांचे बंधू संजय साळवी यांनीही उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. हे सर्वच आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

follow us