Download App

भ्रष्टाचारी, गुन्हेगारांना गृहमंत्र्यांकडून अभय? राऊतांनी थेट दिले ‘हे’ चॅलेंज!

Sanjay Raut News : देश आणि राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या फायली मी ईडी आणि सीबीआयकडे पाठविल्या आहेत. भाजपाच्या अनेक भ्रष्ट नेत्यांवर कारवाई झाली तर मी पाच लाख रुपये देतो. या राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचाऱ्यांना आणि गुन्हेगारांना कसे पाठिशी घालत आहेत हेच मला आता दाखवायचं आहे, असे आव्हान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले.

राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचारी गुन्हेगारांना कसे पाठिशी घालत आहेत हे दाखवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 2024 मध्ये जेव्हा सरकार बदलेल तेव्हा या सगळ्या कारवाया पुढे जातील, असा इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्रातले मंत्री कमिशनखोर, खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपाने खळबळ

कर्नाटकातील भाजपाच्या पराभवावरही त्यांनी भाष्य केले. कर्नाटकमध्ये जो निकाल लागलेला आहे तो जनतेचा कौल आहे. कर्नाटकमध्ये प्रधानमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या इतर राज्यातील मुख्यमंत्री अशी सगळी आर्मी लावून सुद्धा त्या आर्मीचा पराभव कर्नाटकच्या जनतेने केला. जे 1978 साली इंदिरा गांधींच्या बाबतीत झालं होतं. त्याची सुरुवात आता पुन्हा कर्नाटक पासून सुरू झाली आहे. कर्नाटक अभी झाकी है पूरा देश बाकी है. महाराष्ट्र राज्य हे भाजपने लुटलेलं राज्य आहे. लुटीच राज्य सरकार टिकत नाही, असे राऊत म्हणाले.

मुनगंटिवारांना विचारतं कोण ?

पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरेंना धडा शिकविण्यासाठी एक राजकीय खेळी होती असे विधान वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांनी केले होते. त्यावर राऊत म्हणाले, सुधीर मुनगंटिवार यांना त्यांच्या पक्षातही कोणी विचारत नाही. त्यामुळे त्यांनी काही बोलले तरी काहीच फरक पडत नाही.

अकोल्यात राडा! सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, दगडफेकीत एका जणाचा मृत्यू

आज महाविकास आघाडीची बैठक 

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज सायंकाळी बैठक होणार आहे.  या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. 2024 च्या दृष्टिकोनातून लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीत जागा वाटपाची सूत्र काय आहेत. याबाबतीत चर्चा होऊ शकते, असे राऊत म्हणाले.

Tags

follow us