Download App

Prakash Ambedkar : “लेखी देण्यास राऊतांचा नकार, निवडणुकीनंतर भाजपबरोबर जाणार नाही, खात्री द्या”

Prakash Ambedkar Letter to Jitendra Awhad : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती अजून नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आघाडीच्या बैठका किंवा कार्यक्रमांना जाऊ नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या आवाहनामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीबरोबर येणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जाहीर पत्र लिहीले होते. या पत्रात आव्हाडांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आंबेडकर म्हणाले, आपण लिहिलेले पत्र व्यक्तिगत आहे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्द व्यक्तिगतरित्या खात्री आहे. पण, आपल्या पक्षाबद्दल खात्री देता येत नाही. कारण, याआधी आपल्या पक्षाने भाजपबरोबर समझोता केलेला आहे. संविधान वाचविण्याची जी व्यक्तिगत जबाबदारी आपण घेतलेली आहे, त्याच्याशी सहमत आहोत. पण, आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का, याबाद्दल आमच्या मनात शंका आहे.

…तर आपणाला कधीच माफ करणार नाही, आव्हाडांचे प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र

या पत्राच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत की त्या बैठकीत आपल्या पक्षाचे प्रतिनिधी होते. त्या बैठकीत आम्ही सांगितले होते की निवडणुकीनंतर आम्ही भाजप किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते ते यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शवला. त्यावेळी आपणच फक्त म्हणाला होतात की लेखी द्यायला काय हरकत आहे. ज्या शिवसेनेला आपण बरोबर घेतले आहे त्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी असे लिहून देण्यास उघडउघड नकार दिला आहे.

या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की निवडणुकीनंतर तुम्ही भाजपबरोबर जाणार नाहीत. ही खात्री व्यक्तिगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात म्हटले आहे. यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us