Download App

“शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव राऊतांनीच मांडला होता”, मंत्री गुलाबराव पाटलांच्या दाव्याने खळबळ!

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे (Eknath Shinde) मांडला होता.

Minister Gulabrao Patil : शिवसेनेत फूट पडून आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे. यानंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहण्यास मिळाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Elections) निवडणुकीतही हेच चित्र दिसणार आहे. मात्र, त्याआधीच आरोप प्रत्यारोपांची धार वाढली आहे. शिंदे गटातील नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबतीत खळबळजनक दावा केला आहे. खासदार संजय राऊत यांनीच शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव दिला होता असा खळबळजनक दावा मंत्री पाटील यांनी केला.

काय म्हणाले गुलाबराव पाटील

पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली. शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर पाटील म्हणाले, शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे (Eknath Shinde) मांडला होता, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.

देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढत असताना भाजपचे लोक..संजय राऊतांचा घणाघात

एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळी संजय राऊत यांनाही गुवाहाटीला यायचे होते. मात्र सोबतच्या आमदारांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे त्यांना सोबत घेतलं नाही आणि हीच त्यांची मोठी पोटदुखी आहे, असा दावा माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. जर असल्या पूजा करुन कोण निवडून येत असतं तर आम्हाला काय कवट्या मिळत नाही का? सूया मिळत नाही का? सगळं थोतांड आहे असे पाटील म्हणाले होते. एकप्रकारे त्यांनी भरत गोगावले यांची पाठराखण केली होती. शिवसेना फुटली त्यावेळेस सर्वात आधी संजय फुटणार होते. मात्र 35 ते 36 आमदारांनी विरोध केला, असे शहाजीबापू पाटील म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊत यांच्याबाबतीत खळबळजनक दावा केला. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांना दिला होता असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या या दाव्यावर आता खासदार संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संजय राऊत हा महालोफर माणूस, गुलाबराव पाटलांची सडकून टीका

follow us