अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह पराभूत झाले. त्यांना बबनराव पाचपुतेंचे पुतणे साजन पाचपुते यांनी पराभूत केले. या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली. कुटुंबातील सदस्याविरोधात निवडणूक का लढविली ? याबाबत साजन पाचपुते यांनी लेट्सअपशी संवाद साधला. मी आणि प्रतापसिंह हे एका आईची लेकरे नसल्याचे सांगत आगामी काळातही सत्तासंघर्ष सुरूच राहणार असल्याचे सूचकपणे सांगितले.
साजन पाचपुते म्हणाले, बबनराव पाचपुते व सदाशिव पाचपुते यांची आई एक होती. त्यांच्यासारखी आमची आई एक नाही. मी आणि सुदर्शन पाचपुते यांच्यात तुटणे अवघड आहे. ते एका कुटुंबात वाढलेले होते. प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली असतात. सदाशिव अण्णा असेपर्यंत त्यांनी अंतर पडू दिले नाही. दोन सख्खे भाऊ तुटणे वेगळे आणि चुलत भाऊ तुटणे वेगळे. मात्र त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले, असा आरोप साजन पाचपुते यांनी केला.
ते म्हणाले, मला ग्रामपंचायत निवडणूक लढवायची नव्हती. काकांच्या विरोधात मी बंड पुकारले नाही. जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे. त्यासाठी मी वारंवार माझ्या काकांकडे जाऊन कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश येत नव्हते. कैलास पाचपुते आणि त्यांचा संपर्क नव्हता. मला नाईलाजाने त्यांच्यासाठी उमेदवारी करावी लागली. मी सरपंचपदासाठी उमेदवारी केली. तरच माझा पॅनल उभा राहू शकत होता. त्यामुळे आम्ही बंड केले.
मी काकांच्या विरोधात बंड केलेले नाही. मी उभा राहिलो, त्यावेळी जनतेने बंड स्वीकारले. साजन पाचपुते बंड स्वीकारणारा नाही. जनतेने ठरविले सदाशिवअण्णांच्या मुलाला श्रद्धांजली म्हणून निवडून द्यायचे. त्यानुसार ही निवडणूक झाली.
कैलास पाचपुतेंचे वडील शिवराम पाचपुते यांच्याकडे २५ वर्षे काष्टीची ग्रामपंचायत होती. विविध कार्यकारी सोसायटी होती. कैलास पाचपुते हे काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांचे कार्यकर्ते. माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊन त्यांना डावलू लागले. माझ्याकडे निवडून येण्यासारखे उमेदवार होते. म्हणून मला सरपंचपदाची निवडणूक लढवावी लागली.
मी बबनदादा यांच्याकडे गेल्यावर ते उमेदवारी अर्ज भरा पाहू, असे सांगायचे. त्यांची यात चूक नाही. कारण त्यांच्या जवळचे लोक या गोष्टी करत आहेत. चुलत भाऊ माझ्या विरोधात उभा राहिला म्हणून मी त्याला पराभूत केले. त्या जागी दुसरा कोणी असता तर मी त्यालाही पराभूत केले असते. त्यांनी चुलत भावाला माझ्या विरोधात उभे केले नसते. तर त्यांचा पॅनल उभा राहिला नसता. तिच स्थिती माझीही होती. त्यामुळे दोन्ही पॅनल परस्पर विरोधात उभे ठाकले.
मी सदाशिवअण्णांच्या कार्यकर्त्यांसाठी संघर्ष उभा केला. सदाशिव अण्णा असते. तर त्यांनी समतोल ठेवला असता. समतोल ठेवणारा माणूस गेल्याने हा संघर्ष उभा राहिला. बबनदादांचा सुरक्षा कवच म्हणजे सदाशिवअण्णा होते. सदाशिव अण्णा गेल्यानंतर चुकीचे लोक त्यांच्या जवळ आले आहेत. त्यांना चुकीच्या गोष्टी सांगत होते. त्यामुळे ही वेळ आली आहे. ते लोक पाचपुते कुटुंबापेक्षा मोठे झाले आहेत. राजेंद्र नागवडे यांच्या काही कार्यकर्त्यांनी तिसरा पॅनल उभा करून काही उपयोग नाही, असे ठरविले. त्यामुळे ते माझ्या बरोबर आले. नागवडेंचे कार्यकर्ते माझ्या बरोबर होते तसेच माझ्या बरोबर सामान्य लोक होते.
बबनराव पाचपुतेंच्या पॅनलचे उमेदवार जास्त निवडून आले. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले की, आमचे सात लोक २० ते ५० मतांनी पराभूत झाले. १२ पेक्षा कमी मतांनी माझे पाच उमेदवार निवडणूक हरले. त्यांच्या एका उमेदवाराच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याच्या विरोधात आम्ही आक्रमकपणे प्रचार केला नाही. सहा क्रमांकाच्या प्रभागात आमचे तीन उमेदवार पराभूत झाले.
मी बबनदादांना सांगितले होते की, ग्रामपंचायत निवडणूक ही तुमच्या आमच्यासाठी छोटी गोष्ट आहे. कार्यकर्त्यांना आपण न्याय देऊ, असे सांगितले. त्यावेळी काही जणांनी जाणीवपूर्वक प्रतापसिंह पाचपुतेंचे नाव सरपंचपदासाठी पुढे केले. त्यांच्या पॅनलमध्ये सदाशिवअण्णांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे ते माझ्याकडे आले. मी त्यांना सांगितले तुम्ही एक तर नागवडेंकडे जा. तेव्हा कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रतापसिंहविरोधात तुम्हीच लढा. त्यांच्या विरोधात दुसरा कोणीही टिकू शकणार नाही. म्हणून मी निवडणूक लढविली. बबनदादांना वाटलेच नव्हते की मी निवडून येईल. त्यामुळे त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही. ते अतिआत्मविश्वासात राहिले. त्यांच्या गटात विजयाचा आत्मविश्वास होता. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली होती. त्यामुळे तेथे मी काहीही करू शकलो नाही.
लोकांना सदाशिवअण्णांना श्रद्धांजली वाहायची होती. कारण ते गेल्यावर ही माझी पहिलीच निवडणूक होती. आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलो होतो. बबनदादांच्या जवळची माणसं सदाशिवअण्णा असे पर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करू शकली नाहीत. त्या कार्यकर्त्यांची काळजी घेणे हे माझे काम आहे. त्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी बरेच काही केले. आज वेळ आली म्हणून मी ग्रामपंचायत निवडणूक लढविली. पुढे काय वेळ येईल हे मी सांगू शकत नाही. मी कधीच काही ठरवून करत नाही. परिस्थिती नुसार मी निर्णय घेतो. मी लोकांसाठी काम करत राहतो. कार्यकर्त्यांशी बोलून पुढील राजकीय वाटचाल ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले. मला ग्रामपंचायत चालविण्याचा अनुभव नाही. त्यामुळे मी राज्यातील आदर्श ग्रामपंचायतीतील सरपंचांकडून मार्गदर्शन घेऊन काम करेल.