पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha constituency) राजकीय घडामोडींना वेग आला असून आता या घडामोडींचे केंद्र अकलूजचे मोहिते पाटील घराणे (Mohite Patil Family) राहिले आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांनी राष्ट्रवादीची तुतारी घेण्याची घोषणा आज केली.
“भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील याचा ओढा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे आहे. आमच्या निर्णयाची त्याला अडचण होऊ शकते. त्यामुळे आम्ही त्याला प्रसंगी वाळीत टाकू. त्याने पण मतदान होईपर्यंत म्हणजे ८ मे पर्यंत घरात यायचं नाही, असे त्याला सांगितले आहे, अशी माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते यांची आज भेट घेतली. त्यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत जयसिंह मोहिते यांनी सारेच उघडपणे सांगितले.
ते म्हणाले,“ आम्ही सर्वांनी पवारसाहेबांसोबत जायचे ठरवले आहे. आम्ही लोकांचे जनमत जाणून घेत होतो. फक्त माळशिरस तालुक्यावर आपण निवडणूक लढवू शिकत नाही. माण, खटाव, सांगोला या ठिकाणी आमच्या कुटुंबाचे सदस्य माहितीचा कानोस घेण्यासाठी गेले. आमच्या कुटुंबाने प्रत्येक गावात भेटी दिल्या. लोकांनीच आम्हाला कमळ घेऊ नका असे सांगितले. तुम्ही तुतारी घ्या, असा लोकांनीच आग्रह केला. तोपर्यंत धैर्यशील मोहिते पाटील हे देखील तयार नव्हते. फडणवीस यांनी आम्हाला मोठी मदत केली आहे. त्यामुळे आमदार रणजितसिंह यांचा भाजपच्या विरोधात जायला नकार होता. ते फडणविसांना घाबरतात. पण आम्ही त्याला घरात यायला मनाई केली आहे. आमच्या कुटुंबातील जे सदस्य भाजपच्या पदावर असतील ते देखील आपल्या पदांचा राजीनामा देतील. आमची आणि पवार साहेबांची चर्चा होऊन पुढच्या गोष्टी ठरतील. त्यामुळे यावर धैर्यशील मोहिते पाटील यावर बोलत नाही. एकदा निर्णय झाला की ते पण बोलतील. आमचा पक्ष फक्त विजयदादा हाच आहे. या मतदारसंघात कोणीही कमळाचं नाव घेत नाही. सगळेजण तुतारीचे नाव घेत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांना आम्ही निवडणुकीत उभे करूच. तो उभा नाही राहिला तर आम्ही त्याचा लंगोट सोडून त्याला लढायला भाग पाडू.“
आमच्या निर्णयाचा बारामती, सोलापूर या मतदारसंघावर मोठा परिणाम होणार आहे. मोहिते पाटलांना मानणारी अनेक घरे या मतदारसंघात आहेत. आमचे तुतारीवर उभे राहण्याचे ठरले आहे. आमची टिम सोलापूर आणि माढा या दोन्ही ठिकाणी काम करेल. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या निमित्ताने कोणाची ताकद आहे, हे कळेल. मी पडद्यामागे राहून काम करणार आहे. कोणती सोंगटी कुठे बसवायची आहे, हे मला चांगलं कळतं. आमच्या निर्णयाचा फायदा काॅंग्रेसलाही फायदा होणार नाही. लोकसभेसाठी भाजपच्या २८-३० पेक्षा जास्त जागा येणार नाहीत. लोकांमध्ये खूप नाराजी आहे. भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत फक्त आवक होती. आता आमच्यामुळे भाजपमध्ये जावक सुरू होणार आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेली मंडळीही या निवडणुकीनंतर पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत येतील, असा विश्वास मोहिते यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा माढ्यातील उमेदवार बदला, अशी आग्रही मागणी केली. त्यामुळे माढ्यात आागामी काळात काय घडामोडी घडणार, याची उत्सुकता असणारआहे.