Varsha Gaikwad : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. केरळ हे मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळे राहुल गांधींची (Rahul Gandhi) बहीण तिथे निवडून येते, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक खासदार झालेत, असं राणे म्हणाले. दरम्यान, राणेंच्या या वक्तव्याचा आता कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जोरदार समाचार घेतला.
मोठी बातमी! प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानावर अखेर आमदार सुरेश धसांकडून दिलीगिरी
नितेश राणे हे सातत्याने हिंदू मुस्लिम, पाकिस्तान अशी भाषा वापरून एका समाजाला टार्गेट करताहेत. शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी विभाजनकारी भाषा खपवून घेणार नाही असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा…
वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, नितेश राणेंनी केरळची पाकिस्तानशी तुलना करून तेथील लोकांना दहशतवाद्यांशी जोडण्याचे विखारी विधान हा संविधानातील सिध्दांतांवर थेट हल्ला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या पदाच्या तत्त्वांशी केलेला हा विश्वासघात आहे. भाजप नितेश राणेंच्या विखारी आणि विभाजनकारी वक्तव्यांचे समर्थन करतो का? अशी असंवैधानिक विधाने करणाऱ्या राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
विभाजनकारी भाषा खपवून घेणार नाही…
पुढं त्या म्हणाल्या, राणे हा सातत्याने हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान अशी भाषा वापरून एका समाजाला टार्गेट करत आहेत. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. नितेश राणेंचा ‘बॉस’ ‘सागर’ बंगल्यातून ‘वर्षा’वर गेल्यामुळे त्यांची हिंमत जास्तच वाढलेली दिसते. पण, मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंच्या विधानावर खुलासा करावा. त्यांच्यावर कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी विभाजनकारी भाषा खपवून घेतली जाणार नाही, असंही गायकवाड म्हणाल्या.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेतेही समाजात विष पसरवणारी वक्तव्ये करत असतात. अमित शाह यांनीही निवडणूक प्रचारादरम्यान वायनाडची तुलना पाकिस्तानशी केली होती. अशा द्वेषपूर्ण विधानांद्वारे भारताच्या सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणून असलेल्या अस्तित्वाला विरोध केला जात आहे. भाजपने आपल्या विभाजनकारी राजकीय अजेंडासाठी सातत्याने घटनात्मक तत्त्वांचे उल्लंघन केलं. भाजप-आरएसएसने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कधी स्वीकारलेच नाही. मात्र हा देश संविधानानेच चालणार, असं गायकवाड म्हणाल्या.
थोरात काय म्हणाले?
केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू-मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलतांना, वागताना भान बाळगले पाहिजे, पण राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या. जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2024