Praful Patel : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर सरकार कोसळलं नसतं तर राज्यात भाजप कधीच सत्तेत आला नसता आणि मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्नही सुटला असता, अशी टीका राष्ट्रवादीवर (NCP) केली होती. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यानंतर आता कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनीही चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. पटेल म्हणाले, 2014 साली राष्ट्रवादीनं सरकार पाडलं असं त्यांचं मत आहे. तर आज राष्ट्रवादीबरोबर त्यांनी युती का केली आहे? त्यांनी युती करायला नको होती. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस राष्ट्रवादी युतीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत असा टोला पटेल यांनी लगावला.
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण ?
मी कडक शिस्त लावण्यासाठी राज्य सहकारी बँक संचालक मंडळ बरखास्त केलं. हे मंडळ बरखास्त झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि माझ्यात वितुष्ट आले. हा निर्णय घेतला नसता तर भाजपाची महाराष्ट्रामध्ये सत्ता आलीच नसती. ती एक राजकीय चूक होती. सहकार क्षेत्राबद्दल मला फारसं माहिती नव्हतं. मी अनेक गोष्टी समजून घेतल्या. सहकार क्षेत्रामध्ये शिस्त आणायचा प्रयत्न केला. त्यावेळी राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झाले. त्यांनतर आमच्यात वाद झाले. त्याचे परिणाम सरकार पडण्यात झाला. हे मंडळ बरखास्त केलं नसतं तर 2014 आणि 2019 ला देखील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता राहिली असती. भाजप सत्तेत आली नसती अशी स्पष्ट कबुली चव्हाण यांनी दिली.
चव्हाणांमुळेच काँग्रेसचा चौथा नंबर – तटकरे
ज्या हेतूने पृ्थ्वीराज चव्हाण दिल्लीतून राज्यात आले. आघाडी सरकारची लय बिघडली. आघाडी सरकारमधील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून मी स्व. विलासराव देशमुख यांच्याकडे पाहतो. आघाडी सरकारचा मुख्यमंत्री कसा असावा याचं चांगलं उदाहरण ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं. अशोक चव्हाणांनीही उत्तम काम केलं. पण, पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सतत पाण्यात बघतच त्यांचा कारभार करत आलेले होते. त्याचा परिणाम राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसलाच जास्त भोगावा लागला. आज राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली याला कारण कोण असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण आहेत.
Prithviraj Chavan : ..म्हणून राष्ट्रवादीनं आमचं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा खुलासा