प्रशांत गोडसे-मुंबई प्रतिनिधी-
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मृत्यूच्या तीन दिवसानंतर आता राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एनसीपी) नेतृत्व कोणाकडे जाईल, उपमुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होईल आणि त्यांच्याकडील महत्वाच्या खात्यांचे वाटप कसे होईल, यावर चर्चा सुरू झाल्या आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलीय. दरम्यान राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राजकीय भूमिका जाहीर केलीय.
Ajit Pawar Plane Crash : टेबल टॉप रनवे धोकादायक का? बारामतीतील घटनेनंतर चर्चेला फुटलं तोंड
उपमुख्यमंत्रिपदाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. यासोबतच आज किंवा उद्या सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. जय पवार आणि पार्थ पवार यांच्याशीही संवाद साधणार असून, सर्व आमदारांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नावाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या आणि जनतेच्या भावना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. त्या भावनांचा आदर राखूनच योग्य निर्णय घेतला जाईल, तसेच त्यांच्या नावाला विरोध नाही, असे प्रफुल्ल यांनी सांगितले.एनसीपीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अजित पवारांच्या खात्यांचे वाटप पक्षाकडेच राहावे, अशी मागणी केली असल्याचे समोर आले आहे. याबाबत पक्षाकडून अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत मोठी अपडेट; सीआयडीमार्फत चौकशीचे आदेश
अजित पवारांकडे कोणते खाती होती ?
अजित पवार यांच्याकडे वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण (अतिरिक्त जबाबदारी), अल्पसंख्याक विकास आणि औकाफ (अतिरिक्त जबाबदारी) ही खाते होती. ही खाती महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे . वित्त आणि नियोजन खाते हे राज्याच्या बजेट आणि विकास योजनांशी निगडीत असून, राज्य उत्पादन शुल्क हे महसूलाचे प्रमुख स्रोत आहे. क्रीडा आणि युवक कल्याण खाते युवकांच्या विकासासाठी तर अल्पसंख्याक विकास खाते सामाजिक न्यायासाठी महत्वाचे आहे. त्यासोबत अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पुणे जिल्ह्यात त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली असून, त्यांच्या अनुपस्थितीत या जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे सदर खाती राष्ट्रवादीकडेच असावी मागणी केली असल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांबरोबर तब्बल एक तास बैठक
एनसीपीच्या नेत्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. प्रफुल्ल पटेल हे केंद्रातील प्रभावी नेते असून, सुनील तटकरे प्रदेश पातळीवर पक्ष संघटना सांभाळतात. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास बैठक चालली. काही वेळापुरी माजी मंत्री धनंजय मुंडे देखील वर्षावर दाखल झाले होते. या तिघांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने पक्ष एकजुटीने पुढे जाईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री पदासाठी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्तावावर देखील चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी आणि महायुतीतील भागीदार पक्षांच्या अपेक्षा यामुळे खातेवाटप सोपे नसेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
