Panjabrao Dakh : परभणी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने सर्वांनाच धक्का देत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने परभणी मतदारसंघातून बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र 4 एप्रिल रोजी वंचितकडून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
डख यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ता डॉ. रामराज चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सुमित जाधव उपस्थित होते. या उमेदवारी अर्जासाबोत त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रही दिलं आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण मालमत्तेची माहिती दिली.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकडे फक्त 10 हजार रुपयांची रोख रक्कम असून त्यांच्या पत्नीच्या नावावर 1 लाख रुपयांची एफडी आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार पंजाबराव डख यांच्याकडे बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट आणि स्प्लेंडर असून यांची एकूण किंमत 2,30,000 रुपये आहे. तर सोन्याबाबत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे जवळपास दीड तोळे सोने आहे. तर त्यांच्या पत्नीकडे एकूण दहा तोळे (100 ग्रॅम) सोने असून त्याची किंमत 7,00,000 रुपये आहे.
सचिन पिळगावकर निवडणुकीच्या रिंगणात, शिंदे गटाकडून ऑफर? म्हणाले, ”मी लोकसभा निवडणुकीत…”
प्रतिज्ञापत्रानुसार पंजाबराव डख यांच्या नावावर कोणतीही राष्ट्रीय बचत योजना किंवा पोस्ट ऑफिस योजना नाही. याचबरोबर ते शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत नाहीत.
पंजाबराव डख यांच्याकडे एकूण 23 लाख 17 हजारांची संपत्ती आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 80 लाखांची संपत्ती आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता याचा समावेश आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये खुप लोकप्रिय झाले आहे. त्यांनी याच लोकप्रियतेचा फायदा घेत आता राजकारणात एंट्री केली . हवामानाचा अंदाज चुकल्याने त्यांना अनेकदा विरोधाचा देखील सामना करावा लागला आहे.
पंजाबराव डख परभणीचे भूमिपुत्र असल्याने ते त्यांच्या होम ग्राउंडच्या राजकारणात आपला किती प्रभाव पडणार आणि त्यांना मतदारराजा स्वीकारणार का? हे पाहावे लागणार आहे.