Pankaja Munde : महायुतीच्या राज्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आगामी लोकसभेच्या जागावाटपासाठी महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्यात लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार कोण असणार याबाबत कोणताही स्पष्टता नाही. मात्र, त्याआधीच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी लोकसभा उमेदवारीचे संकेत दिलेत. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढं मी तुमची काळजी घेईल, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उमेदवारीचे संकेत दिलेत.
Government Schemes : गांडूळ खत अनुदान योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येणार?
बीड जिल्ह्यातील शिरूर येथील सिद्धेश्वर देवस्थान संस्थेच्या हरिनाम सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी सध्या माजी आमदार आणि माजी ग्रामविकास मंत्री आहे, त्यामुळे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही… इथे बसलेल्या किती जणांनी ‘माजी’ केले हेही सांगता येत नाही. मंचावर बसलेले आमदार सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सगळे सत्ताधारी लोक आहेत. आजी नेत्यांनी माजी नेत्यांची काळजी घ्यावी. कारण त्यांना आजी करण्यात माजी नेत्यांचाही हात असतो. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, मग मी तुमची काळजी घेईन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला कोणी माजी बनवले हे मला आता सांगता येत नाही. कारण, सर्वजण एकत्र आले आहेत. मात्र, जेव्हा माझ्यावर रेड पडली तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी अकरा कोटी रुपये जमा केले, हे माझं लोकांच्या हृदयाशी असलेलं नातं आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांना राज्य सरकारच्या कारभारावही भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, सरकार सध्या तीन इंजिनने जोडलेले असून काही वेळ हे इंजिन एकमेकांना भिडले होते. मात्र, आता ते बरोबर पटरीवर चालत आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, पंकजा मुंडे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांची बीडमध्ये मोठी ताकत आहे. बीडमधील मोठा जनसमुदाय पंकजा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण तरीही भाजपने पंकजा यांचे राजकीय पुनर्वसन केलेले नाही. मात्र, आता त्या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. पण त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप पंकजा मुंडे यांना तिकीट देऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळं पंकजा यांना तिकीट मिळणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.